Header Ads

शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी पंतप्रधानांना भेटणार : शरद पवारउस्मानाबाद -  मागील तीन-चार दिवसात उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार उस्मानाबाद जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत.  रविवारी (ता.18) सकाळी साडे नऊ वाजता तुऴजापूरात दाखल झाले. तूळजापूर शहरापासून आठ ते दहा किमी अंतरावर असलेल्या कांक्रबा परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी  उपस्थित शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत व्यथा मांडल्या.


साहेब आमचे खूप नुकसान झाले आहे. आमचे सगळच शेत वाहून गेलं आहे. असे सांगतांना शेतकरी व्यंकट झाडे यांचा कंठ दाटून आला. यावेळी शरद पवार यांनी उपस्थित सर्व शेतकर्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. त्यानंतर शेतकरी महादेव वाघमारे यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी केली. तर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांच्याशी देखील चर्चा केली. 

राज्यात अतिवृष्टीमुळं आलेलं आताचं संकट अस्मानी आहे. त्याचे दीर्घकाळ परिणाम होतील. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.


पवार म्हणाले की, दीर्घ परिणाम करणारं हे संकट आहे. या परिस्थितीला तोंड देण्याची ताकत तुमच्यामध्ये आहे. ज्यावेळी शेतकऱ्यांची ताकत नसते, तेव्हा सरकारची ताकत उभी करावी लागते. ती आम्ही उभा करू. केंद्राने राज्यांना मदत करायला पाहिजे. राज्याच्या मर्यादा आहेत. भूकंपाच्या वेळी मी काही दिवस या भागात फिरत होतो. त्यावेळी पैसे उभे केले. जागतिक बँकेतून पैसे आणले. महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा मदत केली. त्यावेळी मी करू शकलो. आत्ता त्या संकटाला राज्य सरकारची एकट्याची ताकत आहे, असं मला वाटत नाही, असं शरद पवार म्हणाले.


पवार म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्या या भागात येणार आहेत आणि त्यांच्याशी जाऊन बोलेन. त्यांची मनापासून इच्छा आहे की लोकांना काहीही करून मदत केली पाहिजे.  मदत करायची त्यांची तयारी आहे. तरी एक मर्यादा आहे, त्यामुळे केंद्राची मदत घ्यावी लागेल. याबाबत येत्या दहा दिवसात पंतप्रधानांना भेटू महाराष्ट्राला मदत केली पाहिजे. हा आग्रह धरू, असं ते म्हणाले.स्वत: पंतप्रधान मदत करू असे म्हणत आहेत. या संकटाचं स्वरूप पाहिल्यानंतर आम्हाला मदत करावी लागेल ही त्यांची भावना आहे, असंही पवार म्हणाले.


यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, राज्य परीवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे,राष्ट्रवादी युवकचे महेबुब शेख, प्रताप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष धैय॔शील पाटील नांदुरीकर, संजय निंबाळकर, कुलस्वामिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन सुनिल चव्हाण, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील, आदीत्य गोरे, संजय दुधगावकर, अमित शिंदे, गोकुळ शिंदे, माजी नगरसेवक धनंजय पाटील, महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते. 
No comments