Header Ads

मोदीजी मदत करणार आहेतच;उद्धवजी शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे आकस्मिक निधीतून मदत करा..!

अंतिम आकडेवारी व अनुदानाची रक्कम निश्चित होईपर्यंत तातडीने दिलासा द्या.


आ.राणा जगजितसिंह पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
उस्मानाबाद - परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ऐन सणासुदीच्या काळात हातातोंडाशी आलेले पिक अतिवृष्टीने नेस्तनाबूत झाल्याने आलेल्या नैराश्यातून राज्यात गेले दोन तीन दिवसात विदर्भ-मराठवाड्यात ५ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा दुर्दैवी मार्ग स्वीकारला आहे.प्रधानमंत्री मोदजींनी देखील राज्यातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे म्हटले आहे.मात्र शेतकऱ्यांच्या मानसिकतेच्या विचार करून नुकसानीची अंतिम आकडेवारी व अनुदानाची रक्कम निश्चित होईपर्यंत गतवर्षी प्रमाणे आकस्मिक निधीतून तातडीने मदत करावी अशी मागणी आ.राणा जगजितसिंह  पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.


खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे.जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना सदोष बियाणं असल्याने पिकांची उगवण न झाल्याने दुबार पेरणी करावी लागली व त्यासाठी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले होते.दुबार पेरणी केल्याने दर वर्षी पेक्षा यावेळी उत्पादन खर्च वाढला होता.पाऊस चांगला झाल्याने पीक जोमात असल्याने शेतकरी चांगले उत्पन्न होईल या आशेवर बसले होते.मात्र पिकं  काढणीला आलेले असताना अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्रावर ओढवलेल्या परिस्थितीची व्याप्ती लक्षात घेऊन आपणाशी फोनवरून संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.त्यामुळे केंद्र सरकारची मदत मिळणारच आहे.राज्यातील खासदारांचे शिष्टमंडळ देखील केंद्र सरकारने मदत करावी यासाठी मोदींजींना भेटणार असल्याची आज घोषणा झाली आहे.केंद्राच्या मदतीसाठी राज्य सरकारचा अहवाल ,केंद्रीय पथकाची पाहणी आणि तद्नंतर केंद्राकडून मदत प्राप्त होते ही कार्यप्रणाली आपणास ज्ञात असून केंद्र सरकारची मदत मिळण्यासाठीची प्रक्रिया व त्यासाठी लागणारा वेळ पाहता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत आ.पाटील यांनी व्यक्त केले आहे.


राज्य सरकारने तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.परंतु नुकसानीची राज्यातील अनेक जिल्ह्यात असलेली व्याप्ती पाहता तसेच पंचनामा,पीकविमा या सर्व क्लिष्ट प्रक्रिया असल्याने त्या वेळखाऊ देखील आहेत.मी व्यक्तीशः अनेक ठिकाणी भेट देऊन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या असता शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून त्यांचे मनोधैर्य पूर्णतः खचले असल्याबाबत आ.पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना अवगत केले आहे.


गेल्यावर्षी अशीच अतिवृष्टी झाली तेंव्हा महायुतीचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राची मदत येण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना तातडीने मदत म्हणून प्राथमिक १० हजार कोटींची तरतूद करण्याचा निर्णय घेतला होता ही बाब पत्रात नमूद करत आ.पाटील यांनी  उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे पाहणी करण्यासाठी आल्यावर हेक्टरी ₹ २५०००/- ते ₹ ५०००० /- मदत देण्याची मागणी केली होती त्याची आठवण करून देत,त्यांना आपण आतातर राज्याचे प्रमुख असल्याने शेतकऱ्यांच्या आपल्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या मानसिकतेच्या विचार करून नुकसानीची अंतिम आकडेवारी व अनुदानाची रक्कम निश्चित होईपर्यंत गतवर्षी प्रमाणे आकस्मिक निधीतून तातडीने मदत करावी ही आग्रहाची विनंती केली आहे.
No comments