उमरग्यात वीटभट्टी मजूर महिलेवर बलात्कार करणारे आरोपी मोकाट

 महाराष्ट्रात 'बलात्कार राज ' सुरु आहे का ? - भाजप 
मुंबई  - उस्मानाबाद जिल्ह्यातील  उमरगा तालुक्यातील एका  मजूर महिलेवर वीटभट्टी चालकांनी तिच्यावर आठवडाभर बलात्कार करण्याची घटना उघडकीस आल्याने राज्यात 'बलात्कार राज' चालू असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. गृहमंत्र्यांच्या नागपूर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत बलात्काराच्या 3 घटना घडल्या आहेत. यावरून गुन्हेगारांना कायद्याचा धाकच वाटेनासा झाल्याचे दिसते आहे. पत्रकार परिषदा घेत बसण्याऐवजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस यंत्रणेची जरब निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत ,  अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता महाराष्ट्रात येऊन पीडित महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना भेटण्याची तसदी घेणार का , असा सवालही श्री. पाठक यांनी या पत्रकात केला आहे.


विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी महिलांना शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे, सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचाच आपल्या सरकारवर विश्वास राहिलेला नाही , असे आता म्हणायचे का , असेही श्री . पाठक यांनी पत्रकात नमूद केले आहे.  


श्री. पाठक यांनी पत्रकात म्हटले आहे की, उस्मानाबाद  जिल्ह्यातील उमरगा येथे मजूर महिलेवर वीटभट्टी चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांकडून आठवडाभर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहेत. त्यांना अटक झालेली नाही. गृहमंत्री देशमुख साहेब , महाराष्ट्राची मान शरमेने खाली जाते ती अशा घटनांमुळे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून महिला , तरुणी , अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात  हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मिरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव अशा 7 ठिकाणी महिला / तरुणींना जाळून टाकण्याच्या घटना घडल्या. हिंगणघाट च्या घटनेनंतर राज्य सरकारने दिशा कायद्याची अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले होते . मात्र अजूनही हा कायदा राज्यात लागू झालेला नाही.


लॉकडाऊन काळात पनवेल,  पुणे ,इचलकरंजी , नंदुरबार,  चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार , विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.  अमरावती जिल्ह्यातील  बडनेरा येथे शासकीय लॅबमधील टेक्निशियनने कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे.  कराड येथे 10 वर्षाच्या मुलीवर 54 वर्षीय नराधमाकडून बलात्कार, मौजे करंजविहीरे (ता.खेडजि.पुणे) येथे 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या, मौजे नांदुरा (जि.बुलढाणा)येथे ३वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार, पाबळ ता.शिरूर जि.पुणे येथे 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, चंद्रपूर येथे 16 वर्षीय मुलीवर सामुहीक  बलात्कार झाल्याने मुलीची आत्महत्या, मुंबई शहरात चालत्या गाडीत 15 वर्षीय मुलीवर सामुहीक लैंगिक अत्याचार अशा अनेक घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत. या घटना पाहिल्यावर महाराष्ट्रात पोलीस नव्हे तर बलात्कार राज चालू असल्याचे नाईलाजाने म्हणावेसे वाटते.


 काँग्रेस नेते राहुल व प्रियांका गांधी यांना आता उस्मानाबाद जिल्ह्यात येऊन पीडित महिलेची भेट घेण्यासाठी वेळ मिळेल का, असा सवालही श्री . पाठक यांनी पत्रकात केला आहे.


 

No comments