मुरूम : खुनाचा गुन्हा दाखल न केल्यास कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

 
 मुरूम  : खुनाचा गुन्हा दाखल न केल्यास कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा


उस्मानाबाद   -  उमरगा तालुक्यातील मुरूम येथील बालाजी सुरेश कांबळे याचा २३ मार्च २०२० रोजी गावातील काही लोकांनी संगनमत करून खून केला असून या घटनेला सात महिने झाले तरी पोलीसांनी खुनाचा गुन्हा करून आरोपींना अटक केली नाही. येत्या २० ऑक्टोबरपर्यंत खुनाचा गुन्हा नोंदवून न्याय न मिळाल्यास २१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा मयताचे वडील सुरेश कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.


या संदर्भात सुरेश कांबळे यांनी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, उमरगा तालुक्यातील मुरुम येथील सुरेश कांबळे यांचा मुलगा बालाजी कांबळे याचा दि. २३ मार्च २०२० रोजी गावातील काही लोकांनी संगनमत करून खून केला आहे. पोलिसांनी ७ महिने झाले तरी गुन्हा नोंद करून आरोपींना अटक केली नसून न्याय मिळण्याच्या प्रतिक्षेत आहोत. न्याय मिळावा म्हणून वंचित बहुजन आघाडी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे  निवेदन देण्यात आले होते. 


टिपरसे यांच्याकडून दबाब 

मागे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यात आले असता, त्यांनी हे निवेदन अतिरिक्त पोलिस अधीक्षक पालवे यांच्याकडे पाठविले होते. पालवे यांनी या खून प्रकरणाचा तपास तुळजापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी टिपरसे यांच्याकडे दिला. त्यांनी एकाच दिवशी संशयित आरोपी व आम्हाला तुळजापूरला बोलविले. आमच्यावर प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणला जात आहे. गावात रहायचे असेल तर प्रकरण मिटवून घ्या अन्यथा तुम्हालाही जीवे मारु अशी धमकी दिली जात आहे. 

येत्या २० ऑक्टोबरपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास संपूर्ण कुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करेल, असा इशारा दिला आहे. यावेळी सुरेश कांबळे. सुनिता कांबळे, अंदाबाई‌ कांबळे, प्रशांत कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मारुती बनसोडे, जिल्हा महासचिव धनंजय शिंगाडे, प्रवक्ते राम गायकवाड व विकास बनसोडे आदी उपस्थित होते.

From around the web