Header Ads

ओला दुष्काळ : लातूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्यालातूर -  यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीला कमी पाऊस  झाल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणी करण्याची वेळ आली. दुबार पेरणीनंतर हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे हातचे गेले.  त्यामुळे लातूर जिल्ह्यातील अनेक  शेतकऱ्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. यातूनचं दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.


निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील अल्पभुधारक शेतकरी परमेश्वर नागनाथ बिरादार (वय 34) यांनी विहिरित उडी घेऊन आपलं जीवन संपवलं. शेती कमी असल्याने कुटुंबातील सदस्य लातुरला मोलमजूरी करत होते. तर परमेश्वर घरची शेती पहात होता. यावर्षी सोयाबीन चांगले आले होते. पिकाची काढणी देखील झाली होती. त्याच दिवशी तुफान पाऊस झाला आणि काढलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले. यामुळे मानसीकरित्या खचलेला परमेश्वर दोन दिवसांपासून घरातून गायब होता. रात्री उशिरा त्याचा मृतदेह विहिरित सापडला. औराद शाहजनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


उदगीर तालुक्यातील वाढवना खुर्द येथील गोपीनाथ ग्यानोबा मद्देवाड (वय 68) यांना तीन एकर शेती आहे. यावरच त्यांच्या घराची रोजीरोटी चालते. मात्र, यावर्षी सततच्या पावसाने त्यांचा घात केला. लोकांची देणी कशी द्यावी? कारण हातात आलेले पिक पावसानं हिरावलं. यामुळे शेतातील झाडाला गळफांस घेत त्यानी जीवनयात्रा संपवली आहे. या बाबत वाढवना पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

No comments