तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे गजाआड होणार

 


तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे गजाआड होणार


तुळजापूर - महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या प्राचीन  सोन्या -चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक सह व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यासह अन्य दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील  सोन्या चांदीचे दागिने तसेच ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर कल्याणराव गंगणे यांनी त्याचे वकील शिरीष कुलकर्णी मार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे 9 मे 2019 रोजी केली होती, त्यांनतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी तात्काळ याचे गांभीर्य ओळखून चौकशी समिती नेमली होती.

मौल्यवान दागिन्यांच्या या चोरी प्रकरणात दोषी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची शिफारस चौकशी अहवालात करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानुसार तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलिप नाईकवाडी यांच्यावर अफरातफर आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षात नोंदविण्यात आला नव्हता. गुरुवार १० सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कौस्तुक दिवेगावकर यांनी शासनाच्या आदेशानुसार याप्रकरणी दिलिप नाईकवाडी याच्यावर मौल्यवान व ऐतिहासीक दागिन्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्काळ तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश मंदिर समितीचे विश्वस्त तथा तुळजापूर तहसीलदार यांना दिले आहेत.

तुळजाभवानी मातेला निझाम ,औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व  २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी   तत्कालीन धार्मिक सह व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता.

मंदिराच्या खजिन्याच्या एकूण अकरा चाव्या होत्या मात्र यापैकी तीन चाव्या हरवल्या आहेत. देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या आहेत. यातील चौथ्या पेटीत अकरा दागिन्यांची नोंद होती, ज्यात चांदीच्या पादुका गायब असल्याचं आढळलं. पाचव्या पेटीतील अलंकारही पळवून नेले असल्याचे आढळून आले. 

तुळजाभवानी देवीचे हे गायब केलेले प्राचीन दागिने व 71 नाणी कोणाला देण्यात आले हे तपासात स्पष्ट होणार आहे , यापूर्वी तुळजाभवानी देवीला अर्पण केलेल्या अनेक महागड्या वस्तू , साड्या , चांदीच्या मूर्ती या तत्कालीन मंत्री , राजकारणी व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना भेट देऊन त्याची मेहेरनजर मिळविण्याचे प्रकार घडले होते. नूतन जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंदिर समितीत आजपर्यंत झालेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. 

तुळजाभवानी देवीच्या दागिन्यांवर डल्ला मारणारे गजाआड होणार




From around the web