चिटफ़ंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारची आलिशान कार उस्मानाबादेत

 
पोलिसांनी कार जप्त न केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या 

चिटफ़ंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारची आलिशान कार उस्मानाबादेत


उस्मानाबाद - चिटफ़ंड घोटाळ्यातील आरोपी महेश मोतेवारची एक आलिशान कार  उस्मानाबादेत फिरत असून, एक दलाल तो  वापरत आहे. पोलिसांना याची  माहिती असूनही पोलीस ही  कार ताब्यात घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी  समृद्ध जीवन फूड्स इंडिया प्रा. लि .आणि समृद्ध जीवन मल्टिस्टेस्ट मल्टिपर्पज कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवारसह  २५ आरोपीना पोलिसांनी  अटक करून विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे विभागाकडे आहे. सीआयडीने  आतापर्यंत २३३ कोटीची संपत्ती जप्त केली आहे, मात्र उस्मानाबादेत असलेली एक कार आणि उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापुर  येथे असलेली जमीन ताब्यात घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

समृद्ध जीवनच्या पुण्यातील दोन फरार संचालकांना सीआयडीने नुकतीच अटक केली आहे. मोतेवारच्या संपत्तीवर टाच आणण्याचे काम अजूनही सुरु आहे.

असा आहे कारचा नंबर 

उस्मानाबादेतील  होम गार्ड ऑफिस परिसरातील एक दलाल समृद्ध जीवन मल्टीस्टेट कंपनीच्या नावावर असलेली कार  २०१५  पासून वापरत आहे. मोतेवार सध्या जेलमध्ये आहे. तसेच त्याच्या कुटुंबातील सर्वजण जेलची हवा खात आहेत. त्यामुळे कंपनीचा एक दलाल ही  कार  वापरत आहे.

जवळपास १६ लाखाची ही  आलिशान कार असून, त्याचा क्रमांक एम.एच. ४२, के. ७२३५ असा आहे.   समृध्द  जीवन कंपनीचा हा उस्मानाबादेतील दलाल असून, त्याने अनेकांची फसवणूक केली आहे. त्याच्यावर देखील पोलिसांनी फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्याकडे मोतेवरची  आलिशान कार असल्याची माहिती पोलिसांना आहे, पण काही पोलिसांनी चिरीमिरी घेऊन कार जप्त केलेली नाही.

समृद्ध जीवनच्या नावावर उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापूर  येथे जवळपास शंभर एकर शेतजमीन असून, शेळी- मेंढी पशुपालन प्रकल्पच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत  ही  जमीन बळकावण्यात आली आहे.

ही आलिशान कार आणि उत्तमी कायापुर  येथील शंभर एकर शेतजमीन सीआयडी ताब्यात घेणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.

Video


From around the web