उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी 'क्लाउड फिजिशियन'ची मात्रा !

 

बंगलुरूचे विशेषज्ञ राहणार २४ तास उपलब्ध , मृत्यू कमी करण्यासाठी पुढाकार


 उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी 'क्लाउड फिजिशियन'ची मात्रा !



उस्मानाबाद  - जिल्हा रुग्णालयात क्रॉम्प्टन ग्रीव्हज व तेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व बंगलोर येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातुन 'क्लाऊड फिजिशियन’ टेलिमेडीसिनचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये बंगलुरूमधील पथकाव्दारे अतिदक्षता विभागात उच्च दर्जाचे कॅमेरे व हायस्पीड इंटरनेट सुविधा बसवून 'टेली आयसीयू' व्यवस्था उपलब्ध केली जाणार असून यात कॅमेऱ्याव्दारे विशेष सॅफ्टवेरच्या सहाय्याने चोवीस तास रुग्णांवर बंगलुरू येथील क्लाऊड फिजिशियन लक्ष ठेवणार असून ते रुग्णांची स्क्रीनवर प्रत्यक्ष स्थिती बघून उपचारासाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे. वाढता मृत्युदर कमी करण्यासाठी हा विधायक पुढाकार घेण्यात आला आहे.


जिल्ह्यात मेडिकल कॉलेज नाही,सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व टरशरी केयर रुग्णलाय नाही.त्यात पुरेसे डॉक्टर्स देखील उपलब्ध नाहीत त्यामुळे अतिदक्षता विभागातील अत्यवस्थ रुग्णांना उपचार घेण्यास प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.अनेकांना वेळेत व याेग्य उपचार मिळाले नसल्याने आपले प्राण गमवावे लागले आहेत.प्रधानमंत्री नरेंद्र मोदींजींनी पी.एम.केयर्स च्या माध्यमातून ८० व्हेंटिलेटर उपलब्ध केले असले तरी त्यासाठी आवश्यक तज्ञ नसल्याने ते वापरा अभावी पडून आहेत.


राज्यात कोविड-१९ चा शिरकाव झाल्यापासून जिल्ह्यात डॉक्टर्स उपलब्ध करून देण्याबाबत आ.पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.मात्र कांही केल्या डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांचा अन्य पर्यायांबाबत विचार विनिमय चालु होता.या अनुषंगाने त्यांची गेली अनेक दिवसांपासून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेचे आयुक्त  डॉ. सुधाकर शिंदे यांच्या सोबत चर्चा चालू होती.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत देखील याबाबत चर्चा झाली होती.


तेरणा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये क्लाऊड फिजिशियन या उपक्रम राबविण्यासाठी आ.पाटील ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून प्रयत्न करत होते.मात्र उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेला येत असलेल्या अडचणी पाहता सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून "क्लाऊड फिजिशियन"उपक्रम सुरू करणे सर्वात योग्य पर्याय असल्याचे लक्षात आल्यानेच हा उपक्रम तेरणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आ.पाटील यांनी म्हटले आहे.


शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील ६ वार्डातील ५०  व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांचे बंगळुरू येथील देशातील नामांकित तज्ञांकडून चोवीस तास सनियंत्रण करता यावे यासाठी उच्च दर्जाचे कॅमेरे व हायस्पीड इंटरनेट सुविधा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या प्रकल्पाला आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी आ.राणाजगजीतसिंह पाटील प्रयत्न करत होते.त्यांना यासाठी आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांची मोलाची मदत झाली असून त्यांनी पुढाकार घेत क्रॉम्प्टन ग्रीव्हज या कंपनीचा  सामाजिक उत्तरदायित्व निधी (Corporate social responsibility) या उपक्रमासाठी काही महिने उपलब्ध करून दिला आहे. नंतर गरजे प्रमाणे तेरणा ट्रस्ट सहकार्य उपलब्ध करेल. 


शनिवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी आ.राणा जगजीतसिंह पाटील,महात्मा फुले योजनेचे आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे ,क्लाऊड फिजिशियनचे डॉ. ध्रुव जोशी व डॉ. रमण आणि क्रॉम्प्टन ग्रीव्हज कंपनीचे वरिष्ठ प्रबंधक यांच्यात झालेल्या व्हर्चुअल मिटिंग मध्ये हा प्रकल्प उस्मानाबाद येथे राबविण्याचा निर्णय झाला आहे. आज दिनांक २८ रोजी आ.पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेकर,क्लाऊड फिजिशियन चे डॉक्टर्स व  जिल्हा रुग्णालयाचे डॉ.सचिन देशमुख यांच्यात हा उपक्रम तातडीने चालू करणेबाबत व्हर्चुअल बैठक पार पडली बैठकीत येत्या आठवडा भरात हा उपक्रम कार्यान्वित व्हावा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करण्याचा निर्णय झाला आहे.



" क्लाऊड फिजिशियन उपक्रमामुळे जिल्ह्यातील अत्यवस्थ कोरोना रुग्णांना देशातील नामांकित तज्ञांचे मार्गदर्शनाखाली उपचाराची सुविधा मिळणार आहे.यामुळे निश्चित अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल.जिल्ह्यात इतर ठिकाणी जिथे अतिदक्षता विभाग व त्यासाठी आवश्यक यंत्रणा आहे मात्र तज्ञ नसल्याने त्याचा वापर होत नाही अशा तुळजापूर, कळंब,परंडा व उमरगा याठिकाणी तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून तिथे उपलब्ध असलेल्या डॉक्टर्स व इतर संबंधित स्टाफ ला प्रशिक्षण देऊन याच पद्धतीने टेलीमेडिसीन अथवा क्लाऊड फिजिशियनची मदत घेऊन रुग्णांना उपचाराची सुविधा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील."

- आ.राणाजगजीतसिंह पाटील 

From around the web