Header Ads

नियम व अटी घालून सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळं उघडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे २९ ऑगस्ट रोजी आंदोलन

- आ.राणाजगजीतसिंह पाटीलउस्मानाबाद  - उपासनेतून माणसाला मन:शांती लाभत असते. आत्मिक व मानसिक शक्ती मिळते. त्यामुळे भाविक प्रार्थनास्थळात जाऊन पूजाअर्चा करीत असतात. सध्याच्या वातावरणात तर मानसिक शांती मिळणे अत्यावश्यक असून कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर गेली ५ महिन्यांपासून राज्यातील सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे बंद असल्याने कोट्यवधी भाविक अस्वस्थ असल्याने नियम व अटी घालून सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळं  १ सप्टेंबर पासून उघडण्यास परवानगी देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाभरात आंदोलन करण्यात येणार असून सर्व धर्मीय नागरिकांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपल्या घराजवळ असलेल्या प्रार्थनास्थळाजवळ घंटानाद किंवा इतर प्रतिकात्मक कृती करून आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन आ.राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला लॉकडाऊन लागू करताना देशातील सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. मात्र अनलॉक-१ च्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने ८ जून पासून अटी शर्तींसह सर्व धर्मियांची प्रार्थना स्थळे उघडण्याची परवानगी दिली होती. याला अनुसरून अनेक राज्यात धार्मिक स्थळं उघडण्यात आली आहेत मात्र महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्याप बंद आहेत. याअनुषंगाने आ.पाटील यांनी दि.२२ जून रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून १ जुलै पासून तुळजाभवानी मंदिरासह राज्यातील सर्व धर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याबाबत मागणी केली होती.

राज्यात आता अनलॉक-३ नंतर सरकारने अटी व नियमांसह अनेक उद्योगधंदे, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याची परवानगी देऊन ८० ते ९० % व्यवहार चालू करण्यास परवानगी दिली आहे. दारूच्या दुकानांना देखील परवानगी आहे मग धार्मिक स्थळं देखील लाखोंच्या उपजीविकेचे साधन असताना फक्त त्यांनाच बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय आहे ? असा प्रश्न आ.पाटील यांनी उपस्थित केला आहे.

दक्षिण भारतातील प्रसिद्ध देवस्थान व्यंकटेश्वरा मंदिर (तिरुपती बालाजी) ११ जूनपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले असून मंदिर प्रशासनाकडून सुरक्षेची सर्व खबरदारी घेवून भाविकांना आत प्रवेश दिला जात आहे. गर्दी टाळण्यासाठी रोज  १२००० भाविकांनाच दर्शनाचा लाभ देण्यात येत आहे. भाविकांना नोंदणी केल्यावर दर्शनाचा दिवस त्यादिवसातील वेळ कळवण्यात येते आणि आपल्या वेळेच्या १ तास आगोदर मंदिर परिसरात येण्याची परवानगी देण्यात येते. मा.सर्वोच्च न्यायालयाने देखील पर्युषण पर्व असल्याने जैन धर्मियांची मंदिरे उघडण्यास परवानगी दिली आहे.


राज्यातील इतर प्रार्थना स्थळांसोबत तुळजापूर स्थित महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेचे मंदिर देखील गेली ५ महिन्यांपासून बंद असल्याने याठिकाणी पूजेला लागणारे साहित्य व फुलहार विक्री करून ज्यांची गुजराण चालते अशा हजारो नागरिकांच्या हातातोंडाशी येणारा घास बंद झाला आहे. भाविकांचा ओघ बंद असल्याने हाताला इतर कुठलेही काम नाही. त्यामुळे पैशांची येणारी आवक पूर्णपणे मंदावली आहे. दैनंदिन खर्चात कुठलीही बचत करता येत नसल्यामुळे या सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे व राज्यभरातील इतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पण अशीच परिस्थिती आहे.

राज्यात कोट्यवधी सर्वधर्मिय नागरिक पिढ्यानपिढ्या दररोज नित्यनियमाने आपल्या प्रार्थनास्थळात जाऊन उपासना करत आहेत मात्र गेली पाच महिने प्रार्थना स्थळं बंद असल्याने प्रचंड अस्वस्थ आहेत. राज्य सरकारने आरोग्याच्या दृष्टीने व सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने तोंडाला मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटोकाट पालन करुन मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी यासाठीच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येत असल्याचे  आ.पाटील यांनी म्हटले आहे.

No comments