उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भूखंड विक्रीस स्थगिती

 
 सुनील ढेपे यांच्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्याकडून दखल

उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या भूखंड विक्रीस  स्थगिती



उस्मानाबाद  - उस्मानाबाद जिल्हा  मराठी पत्रकार संघाच्या सांजा रोड वरील अर्धा एकर ( २० गुंठे ) भूखंड विक्रीस जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली आहे. उस्मानाबाद लाइव्हचे संपादक आणि संघाचे माजी उपाध्यक्ष सुनील ढेपे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही  स्थगिती दिली आहे. त्यामुळे संघाच्या काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांचे मनसुभे उधळले गेले आहेत.

उस्मानाबाद जिल्हा  मराठी पत्रकार संघाचा सांजा रोड वरील अर्धा एकर ( २० गुंठे ) भूखंड आहे. १९९७ - ९८  मध्ये राजेंद्र बहिरे अध्यक्ष असताना, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी दिलेल्या शासन निधीतून हा भूखंड खरेदी करण्यात आला होता. शासनाच्या मदत निधीतून खरेदी करण्यात आलेला हा भूखंड विक्री करता येत नाही, मात्र संघाचे काही काही भ्रष्ट  पदाधिकारी अन्य सदस्यांना अंधारात ठेवून आणि सर्व नियम पायदळी तुडवून विक्री करण्याचा निर्णय घेतला होता.

चार कोटी रुपयाचा हा भूखंड ९५ लाख मध्ये विक्री करून भूखंड मध्ये श्रीखंड  खाण्याचे उद्योग सुरु होते. एका खासगी इसमास पत्रकार संघाच्या शेठजीने ईसार पावती ( नोटरी ) करून दिली  होती. त्याची कुणकुण लागताच उस्मानाबाद लाइव्हचे संपादक आणि संघाचे माजी उपाध्यक्ष सुनील ढेपे यांनी  १३ ऑगस्ट रोजी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्याकडे ईमेलने तक्रार दाखल केली होती. त्याची मावळत्या  जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी दखल घेऊन १४ ऑगस्ट रोजी निवासी जिल्हाधिकारी यांना  चौकशीचे आदेश दिले.

निवासी जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी, सह  जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन  भूखंड विक्रीवर निर्बध घातले आहेत तर या भूखंड विक्रीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश उस्मानाबाद तहसीलदार यांना  दिला आहे.


उस्मानाबाद लाइव्हचे संपादक आणि संघाचे माजी उपाध्यक्ष सुनील ढेपे यांच्या तक्रारीमुळे  पत्रकार संघाच्या भूखंड विक्रीस चाप  बसला असून, संघाच्या काही भ्रष्ट पदाधिकाऱ्यांचे मनसुभे उधळले गेले आहेत.

From around the web