उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी मुंबईत बैठक

 
परिपुर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याचा
 वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचा आदेश 

उस्मानाबादला वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी मुंबईत बैठक


मुंबई  - उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी आवश्यक व परिपुर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैय्या देशमुख यांनी सचिव सौरभ विजय यांना दिले.

उस्मानाबाद येथिल वैद्यकीय महाविद्यालय निर्मीती बाबत सद्यस्थिती जाणुन घेण्यासाठी व ते लवकर होण्यासाठी आवश्यक बाबीवर चर्चा व्हावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे  यांच्याकडे केली होती. त्यांच्या आदेशानुसार व पर्यटक,पर्यावरण, राजशिष्ठाचारी मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्या पुढाकाराने आज सह्याद्री अतितिथीगृह मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला स्वतः आदित्य ठाकरे व संबधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गेल्या कित्येक वर्षापासुन जिल्ह्याला आरोग्याच्या सुविधेसाठी शेजारील जिल्ह्यामध्ये जावे लागत आहे. उस्मानाबाद जिल्हा निती आयोगाच्या यादीमध्ये असुन या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा वगळता इतर सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे या भागामध्ये अद्ययावत वैद्यकीय महाविद्यालय उभा रहावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासुन होत आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या अटी व निकषाची पुर्तता जिल्ह्यातुन करण्यात आली आहे. त्यामुळे विनाविलंब याबाबतीत निर्णय झाला पाहिजे अशी आग्रही मागणी केली होती. त्यानुसार तातडीने त्याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी बैठक घेतली या बैठकीमध्ये त्यानुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली असुन शासन त्यासाठी सकारात्मक असल्याची भुमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री ना अमित  देशमुख यांनी मांडली.

जानेवारी महिन्यामध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालकांनी जिल्हाधिकारी यांना वैद्यकीय महाविद्यालयासाठी जमीनीची उपलब्धतेबाबत विचारणा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनीही 25 एकर जमीन उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय विभागाला कळविण्यात आले आहे. या शिवाय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या इतरही आवश्यक अटीची पुर्तता देखील झाली असुन कुठेही अडचण येऊ नये असा प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचेही.देशमुख यांनी सांगितले. तो प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर ठेवावा लागणार आहे. तो प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रीमंडळासमोर ठेवण्याचे आदेश मंत्री महोदयांनी सचिवांना दिले. त्यामुळे लवकरच हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्ह्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय सूरु होण्याच्या प्रक्रियेला या बैठकीनंतर निश्चितपणाने वेग येईल असा विश्वास आहे.

महाविद्यालसयासाठी ना.आदित्यजी ठाकरे  आग्रही असल्याचे .देशमुख  यांनी यावेळी बैठकीत सूरुवातीलाच सांगितले. सातत्याने त्यांनी महाविद्यालयाच्या प्रक्रियेबाबत माहिती घेतल्याचे सांगितले.  ही बैठक सुध्दा यांच्या विनंतीवरुनच घेतल्याचे ना.अमित देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. कितीही अडचणी आल्या तरी हे महाविद्यालय आपण निश्चितपणे सूरु करु असा विश्वास त्यांनी आदित्यजी ठाकरे साहेब यांना यावेळी दिला.

सदरील बैठकीस पर्यटक,पर्यावरण, राजशिष्ठाचारी मंत्री आदित्यजी ठाकरे  वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.ना. अमित देशमुख , प्रधान सचिव (वैद्यकीय शिक्षण) मा.सौरव विजय, आ.कैलास घाडगे-पाटील आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

From around the web