कोविड साथ, उस्मानाबाद ... एक अनुभवाचे मनोगत ...

 
कोविड साथ, उस्मानाबाद  ... एक अनुभवाचे मनोगत ...


सर्वांना सप्रेम नमस्कार !

             दोन दिवसांपूर्वी मी उस्मानाबादच्या कलेक्टर मॅडम दीपा मुधोळ मुंडे आणि अतिरिक्त कलेक्टर मॅडम रुपाली आवले यांच्या आग्रहावरून सिव्हिल हॉस्पिटलच्या नव्या कोविड बिल्डिंगचा जवळपास तीन तास राऊंड घेतला. ती बिल्डिंग मी पहिल्यांदाच आतून बघत होते.....

           सिव्हिल हॉस्पिटलची ही नवीन चार मजली इमारत अतिशय उत्कृष्ट बांधलेली आहे आणि हॉस्पिटलसाठी आदर्श आहे. मला ती फार आवडली. तिथे खूप हवेशीर आणि मोठे मोठे पॅसेजेस आहेत. चांगलं व्हेंटिलेशन सगळीकडे आहे. नव्याकोऱ्या कॉट्स, नव्या गाद्या, सुरक्षित अंतरावर ठेवलेले बेड्स आणि प्रत्येक बेडला स्वतंत्र ऑक्सिजनचा पॉईंट (फ्लो मीटर सहित) अशी व्यवस्था मला खूप चांगली वाटली. दोन्ही ICUs मध्ये प्रत्येकी आठ-दहा पेशंट ऍडमिट होते. त्यांच्यासाठी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर्स, बायपॅप मशीन्स आणि मॉनिटर्स इत्यादी आहेत.....

          ऑक्सिजनची व्यवस्था मात्र लवकरात लवकर सुधारायला हवी. तिथले जम्बो सिलेंडर्स खूप पटकन संपून जातात. ऑक्सिजन जास्त प्रेशरने आणि uninterrupted flowने मिळायला हवा, यासाठी तातडीने लिक्विड ऑक्सिजन प्लॅंट उभा राहिला तर उस्मानाबाद चे सिव्हिल हॉस्पिटल उच्च दर्जाचे बनेल. तरीपण ऑक्सिजन सिलेंडर्स भरपूर उपलब्ध आहेत हे महत्त्वाचे ! सध्याच्या कोविड काळात आवश्यक असलेली सगळी औषधं, इंजेक्शन्स, सलाईन इत्यादी  उपलब्ध आहेत.....
     
          एक गंभीर त्रुटी मात्र तिथे मला जाणवली आणि ती म्हणजे मनुष्यबळाची तीव्र कमतरता!! जी तातडीने दूर करायला हवी!! प्रत्येक मजल्यावर १०० पेशंटस् ठेवता येतात. त्यासाठी प्रत्येक मजल्यावर एकावेळी किमान तीन डॉक्टर्स आणि आठ नर्सेस यांची गरज आहे. म्हणजे दिवसभरातून चोवीस तासांमध्ये सहा/आठ तासांची ड्युटी करण्यासाठी एवढे डॉक्टर आणि त्या प्रमाणात पॅरामेडिकल स्टाफ त्याठिकाणी लागणार आहेत. आयसीयूमध्ये यांची संख्या जास्त असायला हवी. जास्त संख्येने डॉक्टर मंडळी उपलब्ध झाल्यानंतर इतर पॅरामेडिकल स्टाफ, साफसफाई कर्मचारी यांना सुद्धा धीर येतो आणि त्यांची सुद्धा संख्या वाढेल, धैर्य वाढेल आणि त्यांच्यापण सेवा सुधारतील........

            डॉक्टरांची भूमिका ही सेनापतीची भूमिका आहे. अत्यंत महत्त्वाची आणि कळीची आहे. डॉक्टर हे टीम लीडर्स असणार आहेत. सेनापती हे न भीता, न घाबरता आणि मन लावून काम करतात असे चित्र दिसले, तर बाकीची यंत्रणा आपोआप कामाला लागते..... सरकारी आणि खाजगी डॉक्टरांनी यात न बिचकता काम करायला पुढाकार घ्यायला हवा....

             सरकारी डॉक्टरांना पगार मिळतो, तर खाजगी डॉक्टरांना स्वत:च्या हॉस्पिटल्समध्ये काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत हे लक्षात घेऊन खाजगी डॉक्टरांना योग्य तो मोबदला द्यायला हवा. डॉक्टर्स आणि सहकाऱ्यांना पुरेसे विमा संरक्षण द्यायला हवे......

              सर्व डॉक्टर्सनी त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या हॉस्पिटल्समध्ये सेवा मिळण्यासाठी ज्या काळजीपूर्वक रितीने व्यवस्था लावून घेतलेली असते, तितक्याच काळजीने सिव्हिल हॉस्पिटलमधील व्यवस्था लावून घेण्यासाठी आपल्या अनुभवी सूचना देत रहायला हव्यात. प्रशासनाने त्यांची ताबडतोब दखल घ्यायला हवी....

              मनुष्यबळाच्या गंभीर त्रुटी शिवाय, सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद मध्ये इतरही काही त्रुटी आहेत. परंतु नुसती नावं न ठेवता त्रुटी दूर करायला मदत करणे हे आपलं नैतिक काम आहे असं मी मानते......

           एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे जे पेशंट असतात जे रुग्ण असतात त्यांना आपुलकीची, धीराची गरज आहे. त्यांच्या अनेक छोट्या-छोट्या अडचणी असतात. त्यांना त्यांचे रिपोर्ट्स आले का?  कोणते सॅंपल्स पाठवायचे आहेत? गेले का नाही, आले का नाही, त्यांचे रेकॉर्ड नीट ठेवलेलं आहे का? असे अनेक प्रश्न असतात.  काही लोकांना जेवण चावता येत नाही, जेवण पचत नाही, तिखट लागतं किंवा पुरेसे पाणी प्यायला मिळत नाही. द्यायला घरचं कुणी नसतं.  पुरेसे पांघरूण, बाथरुममध्ये जायला मदत लागते.... यासाठी चोवीस तास सोशल वर्कर्सच्या नेमणुका व्हायला हव्यात.....

             रुग्णांना खाणेपिणे - पथ्यासंबंधीच्या सूचना असतात. विशेषतः किमान तीन लिटर पाणी प्यायला हवं. पुरेसे जेवण करायला हवं. फळं खायला हवीत. पुरेशी विश्रांती घ्यायला हवी. याबद्दल च्या सूचना, तसेच, सार्वजनिक स्वच्छता पाळायला हवी, शारिरीक अंतर पुरेसे राखावे, मास्क वापरायला हवा, सहकार्य करायला हवे, अशा प्रकारच्या सूचना जागोजागी भिंतीवरती मोठ्या अक्षरांमध्ये प्रिंट काढून चिकटवून ठेवण्याची आवश्यकता आहे. सोशल वर्कर्सनी हे पण काम बघायला हवं......

          चांगल्या पद्धतीच्या आणि परिपूर्ण नोट्स टाकणं, चांगले रेकॉर्ड ठेवणं गरजेचं असतं.... पुरेसे मनुष्यबळ, विशेषतः डॉक्टर्स असतील तरच ते शक्य आहे..... नाहीतर, कामाच्या बोजामध्ये इकडे पुरेसे लक्ष देता येत नाही..... काम करायला प्रेरणा रहात नाही..... कामाच्या अती बोजामुळे नकारात्मक विचार प्रबळ होतात......

           सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद मध्ये, चांगल्या दर्जाचे, डिजिटल एक्स-रे मशीन असण्याची आवश्यकता आहे. सध्या साध्या एक्स-रेची क्वालिटी अतिशय खराब आहे......

         ह्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने दुरुस्त करायला हव्यात. त्रुटी दूर करायला हव्यात.....

          हे सगळं जर झालं, तर उस्मानाबाद सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा एव्हढा सुधारेल की पुढील काळासाठी सुद्धा ते एक उत्तम आधुनिक सेवा देणारे हॉस्पिटल ठरेल. अशा ठिकाणी मला स्वतःला सुद्धा ॲडमिट व्हायला आवडेल...... हे करणं अशक्य नाहीय....

          इतक्या चांगल्या दर्जाची इमारत आणि इन्फ्रास्ट्रक्चर इथे सध्या उपलब्ध आहे. प्रश्न फक्त सरकारी आणि खासगी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन तिथल्या दर्जेदार सेवेचा आरंभ करण्याचा आहे!!

       कोविडच्या निमित्ताने, संपूर्ण जगभरातच एक बाब ठळक झाली. ती म्हणजे, सरकारी आरोग्य सेवेचा दर्जा चांगला असलेल्या देशांनी कोरोनाशी मजबूत सामना केलाय आणि तिथे परिस्थिती लवकर नियंत्रणात आली आहे......

            आपल्याकडे एरवी ८०% लोक खाजगी आरोग्य सेवेकडे जात असले तरी, एव्हढ्या मोठ्या संकटाचा सामना सरकारी आरोग्य सेवेमार्फतच सुरु आहे. हे विसरुन चालणार नाही!!!

            मग सरकारी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आपण का गप्प बसतो? लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न सोडविण्यासाठी निवडून दिलेलं असतं. मग त्यांच्याशी या विषयावर आपण बोलत का नाही?

            प्रत्येकाला कसलाही भेदभाव न होता, चांगली आरोग्य सेवा मिळण्यासाठी सरकारी आरोग्य सेवा सक्षम कशी होईल हे पहाणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. ती नुसती डॉक्टरांवर अवलंबून नाही, तर....

         आरोग्यावरचे बजेट वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींकडे आपला आग्रह असायला हवा!!

            कुशल मनुष्यबळ जास्तीत जास्त निर्माण होण्याचा आग्रह धरायला हवा!!
 
               BUDGET- INFRASTRUCTURE- HUMAN RESOURCES
या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करायला हवे.....

          डॉक्टरांना मारहाण, धमक्या हा यावरचा उपाय नाही!! अशामुळे दरी वाढेल, आत्मकेंद्री वागण्याला खतपाणी घातले जाईल.... साध्य काहीच होणार नाही... तर आहे तेही विस्कटेल...

आपल्याला काय हवं आहे हे आपल्या वागण्यातून मिळणार आहे....

 - डॉ स्मिता शहापूरकर

From around the web