श्री रामाच्या दर्शनासाठी अणदूरच्या युवकाने मोटारसायकलवरून गाठली अयोध्या

 
दीड  हजार किलोमीटरचा प्रवास केवळ तीन दिवसात पूर्ण केला...

श्री रामाच्या दर्शनासाठी अणदूरच्या युवकाने मोटारसायकलवरून गाठली अयोध्या


अणदूर - तुळजापूर तालुक्यातील अणदूर ते अयोध्या ( उत्तर प्रदेश ) हे अंतर जवळपास दीड  हजार किलोमीटर आहे. हे अंतर मोटार सायकलवरून केवळ तीन दिवसात कापून अणदूरचा युवक चंद्रकांत गुड्ड याने श्रीराम जन्मभूमीचे दर्शन घेतले, इतकेच काय तर परतीचा प्रवास तीन दिवसात कापून पुन्हा गाव गाठले.

 अनेक वर्षाच्या लढ्यानंतर अयोध्येमध्ये श्रीराम जन्मभूमीचा निकाल लागला आणि त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री  राम मंदिराचे भूमिपूजन पार पडले. या कार्यक्रमास जाण्याची इच्छा चंद्रकांत गुड्ड यांची होती पण मोजक्याच लोकांना अयोध्येमध्ये त्यादिवशी प्रवेश होता.पण अयोध्येला जाण्याची सुप्त इच्छा चंद्रकांत गुड्ड यांना  स्वस्थ बसवेना.

सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे रेल्वे बंद आहेत, त्यामुळे चंद्रकांत गुड्ड यांनी मोटारसायकलवरून अयोध्येला जाण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्याने ईपास काढला. अणदूर ते अयोध्या ( उत्तर प्रदेश ) हे अंतर जवळपास दीड  हजार किलोमीटर आहे.रोज पहाटे पाच वाजता प्रवास सुरु करायचा आणि रात्री सात - आठ वाजता बंद करण्याचे त्याने ठरवले.

त्यानुसार त्याने १५ ऑगस्ट दिवस निवडला. पहाटे ५ वाजता निघून त्याने रात्री नागपूर गाठले. नंतर मध्यप्रदेश,छत्तीसगड मार्गे तिसऱ्या दिवशी १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता त्याने अयोध्या गाठली. अयोध्येमध्ये गेल्या सहा महिन्यापासून अणदूरचे सुपुत्र आणि  विश्व हिंदू परिषदेचे प्रदेश कार्यकर्ते भुजंग घुगे मंदिर उभारणीच्या कामात मदत करीत आहेत. त्यांच्याकडे चंद्रकांत गुड्ड  याने मुक्काम करून दुसऱ्या दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट रोजी त्याने शरयू नदीत स्थान केले आणि नंतर हनुमान गढी, रामलल्लाचे दर्शन घेतले.नंतर श्री  राम  मंदिर उभारणीची पाहणी केली. नंतर २१ ऑगस्ट रोजी परतीचा प्रवास सुरु केला आणि २४ ऑगस्ट रोजी गाव गाठले.

उस्मानाबाद लाइव्हशी बोलताना, चंद्रकांत गुड्ड  म्हणाला की , तीन हजार किलोमीटर प्रवास मोटारसायकलवरून करूनही   कसलाही थकवा आला नाही. जाताना घरातून भाकरी आणि चटणी घेतली होती, तीच खाल्ली. दररोज पहाटे पाच वाजता प्रवास सुरु केला आणि रात्री सात वाजता बंद करीत असे. केवळ तिसऱ्या दिवशी अयोध्या गाठली. अयोध्येमध्ये पोहचल्यानंतर इतका आनंद झाला की, तो शब्दात सांगू शकत नाही.

राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर उभारणीसाठी  सध्या पाया  खुदाईचे काम  सुरु आहे. किमान साडेतीन वर्षे मंदिर बांधकामास लागतील. तेथे कडक सुरक्षा असल्यामुळे फोटो काढता आले  नाहीत, असेही त्याने सांगितले.

From around the web