पाकिस्तानला  निघालेला उस्मानाबादचा प्रेमवीर कुटुंबियांच्या स्वाधीन

 
पाकिस्तानला  निघालेला उस्मानाबादचा प्रेमवीर कुटुंबियांच्या स्वाधीन


उस्मानाबाद - पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडून तिच्यासाठी थेट पाकिस्तानला निघालेल्या उस्मानाबादच्या प्रेमवीराला पोलिसांनी अखेर उस्मानाबादला आणले आणि काही प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये  कुटुंबियांच्या स्वाधीन केले.



 जिशान सलीम सिद्दीकी, वय 20 वर्षे, रा. खॉजानगर, उस्मानाबाद हा दि. 11.07.2020 रोजी सकाळी 09.00 वा. सु. मोबाईल फोन दुरुस्तीचा बहाना करुन घराबाहेर पडला परंतु घरी परतला नाही. यावर त्याच्या कुटूंबीयांनी सायंकाळीच पो.ठा. शहर गाठून बेपत्ता क्र. 16 /2020 नोंदवली. ही हकीकत . पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांना समजताच त्यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पो.ठा. यांना संबंधीत तरुणाचा शोध घेण्यास सांगितले. यावर पोलीस पथकाने जिशानच्या सोशल मिडीया अकाऊंटची सखोल माहिती घेतली असता त्या तरुणाचे तथाकथीत पाकिस्तानी तरुणीशी प्रेमसंबंधाने चॅटींग सुरु असल्याचे व भेटीसाठी ती तरुणी त्याला पाकिस्तानात बोलवत असल्याचे निदर्शनास आले.

उस्मानाबाद पोलीसांच्या सायबर पो.ठा. ने आधुनिक तंत्रज्ञानाने जिशानचा ठावठिकाणा प्राप्त केला. यावर तो कच्छ (गुजरात) परिसरात असल्याचे समजले.  पोलीस अधीक्षक. राज तिलक रौशन यांनी ही हकीकत व जिशानची छायाचित्रे कच्छ (पुर्व) चे पोलीस अधीक्षक व इतर तपास यंत्रणांना कळवून त्यांच्याशी चर्चा केली. उस्मानाबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीवरुन सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. दि. 16.07.2020 रोजी जिशान कच्छच्या वाळवंटातून पाकिस्तान सीमेकडे मोटारसायकल वरुन जात असतांना त्याची मो.सा. वाळूत फसल्याने त्याने ती सोडून देउन पाकिस्तान सीमेच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. दुपारी 16.00 वा. सु. त्याची बेवारस मो.सा. बीएसएफ च्या गस्ती पथकास आढळली होती. तर रात्री 22.00 वा. सु. जिशान यास बीएसएफ बटालीयन क्र. 150 च्या  पथकास हाती लागला होता.

जिशान यास आणन्यास उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे पोउपनि. शकील शेख यांसह पथक दि. 17.07.2020 रोजी गुजरात येथे रवाना झाले होते. परंतु भारत- पाकिस्तान सीमेवरील प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे जिशान सिद्दीकी याच्या विरुध्द गुजरात राज्यातील कच्छ विभाग, गांधीधाम (पुर्व) जिल्ह्यातील खदीर पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 3 / 2020 भा.दं.सं. कलम- 188 सह क्रिमीनल लॉ ॲमेन्डमेंट ॲक्ट कलम- 3 (1), 6 नुसार दि. 17.07.2020 रोजी गुन्हा दाखल झाल्याने उस्मानाबाद पोलीस पथकास जिशानचा ताबा मिळाला नव्हता.

उपरोक्त गुन्ह्यात जिशान सिद्दीकी याची गुजरात मधील न्यायालयाने जामीनावर मुक्तता केल्याने उस्मानाबाद स्था.गु.शा. चे सपोनि- आशिष खांडेकर यांचे पथक गुजरात राज्यात रवाना झाले होते. जिशान सिद्दीकी यास दि. 27.07.2020 रोजी ताब्यात घेउन आज दि. 29.07.2020 रोजी उस्मानाबाद येथे आणुन वडील- सलीम निजामोद्दीन सिद्दीकी यांच्या ताब्यात दिले आहे.यावेळी उस्मानाबादचे प्रतिष्ठित नागरिक मसूद शेख, गफार शेख आदी उपस्थित होते.

जिशान सिद्दीकी बेपत्ता प्रकरणात उस्मानाबाद पोलीसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहायाने त्याचा ठावठीकाणा प्राप्त करुन तात्काळ गुजरात पोलीस व इतर यंत्रणांना सतर्क केल्याने तो पाकिस्तानात जाण्यास अपयशी ठरुन सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागला. उस्मानाबाद पोलीसांनी केलेल्या या प्रयत्नांबद्दल भारावून जाउन सिद्दीकी कुटूंबीयांनी उस्मानाबाद पोलीस अधीक्षक  राज तिलक रौशन,  अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप पालवे, स्था.गु.शा. चे पोनि- श्री. दगुभाई शेख, उस्मानाबाद (श.) पो.ठा. चे सपोनि- श्री. संदीप मोदे, सायबर पो.ठा. चे सपोनि- श्री. सचित पंडीत यांसह पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेत. 

From around the web