कथित प्रेयसीला भेटण्यासाठी उस्मानाबादचा तरुण थेट पाकिस्तानला निघाला आणि पुढे ...

 
कथित प्रेयसीला भेटण्यासाठी उस्मानाबादचा तरुण थेट पाकिस्तानला निघाला आणि पुढे ...


उस्मानाबाद : सोशल मिडीयावरून पाकिस्तानमधील एका मुलीशी ओळख झाल्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये निघालेल्या उस्मानाबादमधील एका २० ते २२ वर्षाच्या  तरुणास सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) पाकिस्तानी सीमेवर  गुरुवारी  रात्री 9.30 वाजता पकडले आहे. उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे



झिशान सिध्दिकी असे या  तरुणाचे नाव आहे. उस्मानाबादच्या खाजानगर  भागात राहणारा हा तरुण एका अभियांत्रिकी महाविद्यालयात मैकेनिकल इंजीनियरिंग मध्ये (सेकंड ईयर) शिकत आहे. त्याचे वडील उस्मानाबादच्या एका मस्जिदमध्ये मौलाना आहेत.


झिशान सिध्दिकी याची सहा महिन्यापूर्वी पाकिस्तान मधील एका मुलीशी सोशल मीडियावरून  ओळख झाली, दोघे सोशल मीडियावरून  (अँप वरून ) बोलत होते. तिला भेटण्यासाठी हा  तरुण निघाला असता, सीमा सुरक्षा दलाने ( बीएसएफ) दलाने  भारत-पाक सीमेवर पकडले आहे. विशेष म्हणजे तो आपल्या कथित प्रेयसीला भेटायला दुचाकीवरुन निघाला होता. देशभरात कोरोनामुळं अनेक ठिकाणी लॉकडाऊन असताना तो तिथपर्यंत पोहोचलाच कसा? हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.



माहितीनुसार, झिशान हा उस्मानाबादहून अहमदनगरपर्यंत सायकलवर पोहोचला. अहमदनगर ते गुजरात मोटार सायकलवर पोहोचला आणि मग पायी चालत सीमेच्या जवळ पोहोचला. गुजरात मधील कच्छ जवळ त्याला पकडण्यात आले. त्याची दुचाकी वाळूमध्ये अडकल्यानंतर तो पायी चालत पाकिस्तानला जाणार होता. सुरक्षा दलाला वाळूत अडकलेली एक दुचाकी सापडल्यानंतर त्यांनी शोध मोहीम सुरू केली. यानंतर त्यांनी झिशानला ताब्यात घेतले. त्यावेळी तो महाराष्ट्रातला असल्याचे स्पष्ट झाले.



 उस्मानाबादचा तरुण पाकिस्तान मध्ये निघाल्याची माहिती  कळाल्यावर एटीएस, सायबर, औरंगाबाद, उस्मानाबाद, मुंबई टीम कार्यान्वीत झाल्या. उस्मानाबाद, औरंगाबाद आणि मुंबई एटीएसने शोध घेतला. त्याचा लॅपटाॅप तपासला गेला. तो पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात आहे, हे लक्षात आल्यावर सीमेवर कळवले होते.   उस्मानाबाद पोलिसांची एक तुकडी या मुलाला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाली आहे. मुलाच्या दाव्यात किती तथ्य आहे, याचा शोध घेतला जाणार आहे. 

From around the web