Header Ads

खरीप पीक विमा भरण्यासाठी 31 जुलैची अंतिम मुदत


उस्मानाबाद - खरीप हंगामात नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 29 जून 2020 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे प्रधानमंत्री पीक विमा योजनेस मान्यता दिलेली आहे. चालू खरीप हंगामात पिक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दिनांक 31 जुलै 2020 ही आहे. पिक विमा योजना ही कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकांसाठी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करणे बाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्याबाबत घोषणापत्र  देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.

या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी 2 टक्के व नगदी पिकासाठी 5 टक्के अशा मर्यादेत ठेवण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पिक शेतात पेरल्याबद्दलचे स्वयंघोषणापत्र, सात बारा उतारा, आधार कार्ड व बँक पासबूकच्या झेरॉक्स प्रतिसह नजिकच्या बँकेत अथवा आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्ता भरुन पिक संरक्षित करावे.

या पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे अवाहन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बजरंग मंगरुळकर यांनी केले आहे. तसेच शेतकऱ्यांनी अधिक माहीतीसाठी PMFBY.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा जीकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा.संरक्षित रकमेवर दिलेल्या पिक विमा दराप्रमाणे विमा हप्ता भरावयाचा आहे त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.

खरीप ज्वारी पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 25 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 500 रुपये आहे. बाजरी पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 22 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 440 रुपये आहे. तूर पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 35 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 700 रुपये आहे. उडीद पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 400 रुपये आहे. मूग पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 400 रुपये आहे. सोयाबीन पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 900 रुपये आहे. मका पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 30 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 600 रुपये आहे. कापूस पिकासाठी प्रती हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 45 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विम्याच्या हप्त्याची रक्कम 2250 रुपये आहे.

No comments