Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात दर शनिवारी जनता कर्फ्यू - जिल्हाधिकारीउस्मानाबाद -  उस्मानाबाद जिल्ह्यात यापुढे दर रविवार एबीजी शनिवारी जनता  कर्फ्यू राहणार आहे. तसेच जिल्ह्यात १४४ कलम लागू करण्यात  पाचपेक्षा जास्त व्यक्ती जमू शकणार नाहीत किंवा रस्त्यावर फिरू शकणार नाहीत. तसेच दुचाकीवर डबल सीट जाता येणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे आणि पोलीस अधीक्षक राज तिलक  रौशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की, सध्या आपल्या जिल्ह्यातही काेरोनाचे रुग्ण वाढत आहेत. ग्रामीण भागातही हा संसर्ग जोराने फैलावत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपायोजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्या लॉकडाऊनचा कोणता विचार नसला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या निर्देशांची आणखीन कडक अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.

यामध्ये पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली असून सर्वच पातळीवर निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. यामध्ये शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदेशाची अंमलबजावणी कडक करण्यात येईल, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, दुचाकीवरून एकापेक्षा जास्त न फिरणे, गर्दी न करणे अशा विविध पातळीवर दिलेल्या निर्देशांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन व झेडपी सीइओ डॉ. संजय कोलते यांनीही त्यांच्याकडील जबाबदाऱ्यांबाबत माहिती दिली.


जिल्ह्यात १४४ कलम लागू
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी त्याची संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यासाठी गर्दी न करणे, एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे आदी बाबी महत्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. हे आदेश दि.३१ जुलैपर्यंत लागू राहणार असून यामधून अत्यावश्यक सेवेतील वाहने, अधिकारी-कर्मचारी तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी व अंत्ययात्रांना सूट देण्यात आली आहे.बाहेर जिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येकाला करणार क्वारंटाइन
शेजारी जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. आपल्या जिल्ह्यातील काही नागरिक रुग्णसेवेच्या निमित्ताने शेजारील जिल्ह्यात जातात. त्यांच्यासोबत कुटुंबातील काही व्यक्ती असतात. अशांना कोरोनाची बाधा होते. मात्र, कुटुंबातील सोबत गेलेली व्यक्ती घरी न थांबता बाहेर फिरतात. त्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्या प्रत्येकाला क्वारंटाइन केले जाणार असल्याचे सांगितले.

व्यापारी महासंघाची रविवारीची सुटी रद्द
दरम्यान, मागील महिनाभरापासून काेरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा व्यापारी महासंघाने प्रत्येक रविवारी साप्ताहीक सुटी जाहीर करून आपले व्यवहार बंद ठेवले होते. याला व्यापाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने प्रत्येक रविवारी बाजारपेेठ बंद आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषदेत प्रत्येक शनिवारी जनता कर्फ्यू जाहीर केला. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी असे सलग दोन दिवस व्यापार बंद ठेवणे सोयीचे नसल्याने व्यापाऱ्यांनी रविवारची त्यांची सुटी रद्द करून त्या दिवशी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

No comments