अणदूर गांजा प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डेसह दोन पोलीस निलंबित

 
मुख्य आरोपी मीना पाटील हिचा शोध सुरु

अणदूर गांजा प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डेसह दोन पोलीस निलंबित


तुळजापूर - अणदूर गांजा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. गांजा पकडला एका पोलीस अधिकाऱ्याने आणि गुन्हा दाखल केला दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याने तसेच याप्रकरणी मुख्य आरोपीस सोडून देण्यात आले होते. या गंभीर प्रकरणी पोलीस  अधीक्षक राजतिलक रोशन यांनी  पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डेसह तुळजापूरच्या उपविभागीय कार्यालयातील पोलिस नाईक रवी राऊत यांना निलंबित केले आहे तसेच मुख्य आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.


 गणेश झिंजुर्डे हे पूर्वी तुळजापूर पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तेथून वाशीला बदली झालेली असताना त्यांनी वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता दि.१७ जूनच्या मध्यरात्रीनंतर ते दि.१८ जूनच्या पहाटेदरम्यान नळदुर्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अणदूर येथे एका अलिशान कारमधून नेण्यात येत असलेला गांजा पकडला होता. परंतु, या कारवाईदरम्यान कारमध्ये नोंदीला आलेल्या दोन आरोपींसह अन्य एक महिला आरोपीही असल्याचे कळते. परंतु, तीला या प्रकरणात नोंदीला न घेता सोडून देत दोघांना अटक दाखवून याप्रकरणी नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला.

खळबळजनक बाब म्हणजे ही कारवाई झिंगुर्डे यांनी तुळजापूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या कार्यालयात संलग्न असलेल्या पोलिस नाईक रवी राऊत याच्या सहकार्याने केली असताना प्रत्यक्षात मात्र पोलिस दप्तरी ही कारवाई उपविभागीय अधिकारी टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नळदुर्गचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राऊत, तुळजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे वाचक- सपोनि रोडगे, नायब तहसीलदार भारती आदींनी केल्याचे नोंदविण्यात आले. परंतु, प्रत्यक्षात कारवाई झिंगुर्डे यांनी केल्याचे समोर येत असल्याने या इतर अधिकाऱ्यांचा यामध्ये काय सहभाग असा ही प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणी माध्यमात बातम्या आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून चौकशी सुरु झाली. प्राथमिक चौकशीत ही कारवाई झिंगुर्डे यांनी केल्याचे समोर आले आहे. तसेच याबाबत वरिष्ठांना कोणतीही पूर्वकल्पना दिलेली नव्हती. सदरील कारमध्ये कारची मालकीन मीना  पाटील(परंडा) ही देखील असल्याचे व तिला सोडून दिल्याचे समोर येत आहे.

गांजा प्रकरणी जप्त करण्यात आलेले वाहन एम.एच. २५, एएल ९१९९ हे मीना पाटील यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी अन्य दोन आरोपीना अटक करण्यात आली असली तरी मुख्य आरोपी असलेल्या मीना पाटील यांना आर्थिक देवाण घेवाण करून सोडून देण्यात आले होते. पोलीस तिचा शोध घेत आहेत.

मीना पाटील या एका राजकीय पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्ष असून गतवर्षी तळेगाव ( पुणे ) येथे एका मोठ्या कापड दुकानात  साड्या चोरताना सापडली होती. आता गांजा प्रकरणी अटक होण्याची शक्यता आहे.

झिंजुर्डेसह राऊत निलंबित
या गांजा प्रकरणी पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी पोलिस उपनिरीक्षक झिंजुर्डे व पोलिस नाईक रवी राऊत यांना दि.२३ जून रोजी निलंबित केले आहे.मात्र कटात  सहभागी झाल्याबाबद्दल कोणती कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.

या पूर्वीची बातमी वाचा 

अणदूरजवळ 98 कि.ग्रॅ. अंमली पदार्थ (गांजा) जप्त, 34 लाखाचा मुद्देमाल जप्त

From around the web