Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात एस.टी. बस सेवा सुरु, पण थंड प्रतिसाद
उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात सोमवारपासून  कंटेमनमेंट झोन वगळता जिल्ह्यांतर्गत एसटी बस सेवा सुरू झाली आहे, मात्र  प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. दररोज १ हजार किलोमीटरचे उद्दिष्ट असले तरी पहिल्या दिवशी प्रवाशांचा प्रतिसाद कमीच होता. ३१ गाड्यातून दिवसभरात ७७३ प्रवाशांनी प्रवास केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एसटी सेवा २५ मार्चपासून बंद होती. मात्र, शासनाच्या सूचनेनुसार रेड झोन वगळता अन्य भागात एसटी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती. रेडझोन बंद केल्यानंतर शासनाने कोरेानाचे रुग्ण आढळणाऱ्या क्षेत्राची कंटेनमेंट झोन म्हणून विभागणी केली. अशी क्षेत्र वगळून अन्य भागात एसटी सुरू करण्याची परवानगी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिल्यानंतर २४ मेपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र, प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याने एसटी बंद असल्यासारखी होती.

शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सोमवारपासून एसटी महामंडळाने सर्वच आगारातून बससेवा सुरू केली आहे. सोमवारी सकाळपासून वाढीव सेवेला सुरुवात झाली. त्यानुसार जिल्ह्यातील ६ आगारातून ३१ गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. या गाड्यांनी सायंकाळपर्यंत १४४ फेऱ्या केल्या. त्यातून ७७३ प्रवाशांनी प्रवास केला तर महामंडळाला ३० हजारांचे अंदाजे उत्पन्न मिळाले. एसटीच्या फेऱ्या वाढविल्या तरी प्रवाशांची संख्या कमी असल्याने व अपेक्षेनुसार उत्पन्न मिळत नसल्याने एसटीचे नुकसान सुरू आहे. दरम्यान, फेरी झाल्यानंतर डेपोमध्ये आलेल्या गाड्यांची साफसफाई करण्यात येत होती.चालक-वाहकांसह प्रवाशांना मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले होते. एसटीमध्ये केवळ ५० टक्के प्रवासी घेण्याच्या सूचना आहेत.कोरेानाच्या भीतीने प्रवासी एसटीतून प्रवास करण्यासाठी पुढे येत नाहीत, असे दिसते.

No comments