Header Ads

वाशी : दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू


वाशी - वाशी तालुक्यातील बनगरवाडी येथे रविवारी सकाळी एक दुदैवी घटना घडली आहे. विहिरीत पोहणार्‍या मुलांना पाहत विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली. अचानक विहीर कोसळल्यामुळे विहिरीच्या काठावर बसलेल्या बारा वर्षीय दोन मुलांचा दगडाखाली दबून मृत्यू झाला. विहिरीत पोहण्यासाठी उतरलेली सहा मुले मात्र या दुर्घटनेतून बचावली आहेत.



एकीकडे कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना वाशी तालुक्यातील बनगरवाडी गावावर रविवारी सकाळी ही  दुदैवी घटना घडली आहे. गावालगत असलेल्या एका दगडी विहिरीमध्ये पोहण्यासाठी रविवारी सकाळी काही शाळकरी मुले गेली होती. या विहिरीत पाणी उपलब्ध असल्यामुळे गावातील तरूण आणि शाळकरी मुले येथे पोहण्यासाठी दररोज जातात. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास सहाजण विहिरीत पोहण्यासाठी उतरले. तर करण पिंटू घोडके व विवेक आश्रुबा लांडगे हे दोघे विहिरीच्या काठावर असलेल्या दगडांवर बसून पाहणार्‍या मुलांना न्याहाळत होते. ज्या ठिकाणी हे दोघेजण बसले होते, त्याच बाजूची दरड अचानक विहिरीत ढासळली. त्यामुळे वर बसलेले दोघेही दगडांसह विहिरीतील पाण्यात कोसळले. त्यांच्या अंगावर दगडाचा ढीग साचल्याने दोघांचा बुडून जागीच मृत्यू झाला.


या दुर्घटनेची माहिती गावात वार्‍यासारखी पसरली. संपूर्ण गाव विहिरीच्या काठावर गोळा झाले. सुदैवाने विहिरीत पोहत असलेल्या सहा जणांचा मात्र यात जीव बचावला आहे. पोलीस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत विहिरीतील पाणी मोटारीच्या सहाय्याने उपसून काढले. दगडाखाली दबलेल्या करण आणि विवेक या दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. घटनास्थळी मयत मुलांच्या नातेवाईक आणि पालकांनी एकच आक्रोश केला होता. या दुर्घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अशी घडली घटना 

  वाशी तालुक्यातील बीड-सोलापूर महामार्गावर वाशी पासून जवळच विजोरा बनगरवाडी ग्रुप ग्रामपंचायत आहे. त्यामध्ये छोटीशी वस्ती असणार्‍या बंगरवाडी येथील मुले शाळेला सुट्टी असल्याने रोज सकाळी गावालगतच असणार्‍या बाबासाहेब महानवर यांच्या शेतातील विहिरीमध्ये गावातील मुले पोहोण्यासाठी रोजच जमा होत होती. रोजच्या प्रमाणे आज सकाळी आठच्या सुमारास गावातील सात ते आठ विद्यार्थी विहिरीवर पोहोण्यासाठी जमा झाले. यावेळी गावातील इयत्ता सहावी मध्ये शिकणारे करण पिंटू बोडके (वय 12 वर्ष) व विवेक आश्रुबा लांडगे (वय 12 वर्ष. हे दोघेही राहणार बनगरवाडी) पोहून झाल्यानंतर त्याच विहिरीच्या काठावर बसले होते. यावेळी इतर गावातील विद्यार्थी विहिरीमध्ये पोहत होते. अचानक या विहिरीची दरड कोसळल्याने विहिरीच्या काठावर बसलेले करण पिंटू बोडके व विवेक आश्रुबा लांडगे दोघेही त्याच विहिरीतील माती व दगडाच्या ढिगार्‍याखाली दबून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

यावेळी विहिरीमध्ये पोहोणारे इतर पाच ते सहा जण घटना घडताच गावाकडे सैरावैरा पळू लागले. गावातील नागरिकांना याची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी या घटनेची माहिती वाशी पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच वाशीचे तहसीलदार संदीप राजापुरे व पोलीस निरीक्षक उस्मान शेख हे त्यांच्या  सहकार्‍यासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने या दोन्ही मयत मुलांना विहिरीच्या बाहेर काढून त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेची माहिती वार्‍यासारखी वाशी तालुक्यात पसरली असून तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments