पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीला केवळ अधिकाऱ्यांना निमंत्रण

 
लोकप्रतिनिधींनी पत्र लिहून मांडल्या समस्या...!

पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीला केवळ अधिकाऱ्यांना निमंत्रण


उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी उपस्थितीत आज कोविड-१९,खरीप पूर्व आढावा व पाणीटंचाई आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती मात्र याबाबत त्यांच्यावतीने प्रशासनाकडून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनाच बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निरोप दिला गेला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यामुळे लोकप्रतिनिधींनी निमंत्रण नसताना बैठकीला जाणे शिष्टाचाराला धरून नसल्याने पालकमंत्र्यांना पत्र लिहून जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या मांडल्या व महत्वाच्या विषयांची बैठक असताना केवळ अधिकाऱ्यांना निरोप दिले व लोकप्रतिनिधींना बोलावले नाही हे दुर्दैवी असून लोकप्रतिनिधींना बोलावले असते तर अधिक योग्य झाले असते अशा भावना व्यक्त केल्या.

आज पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कोविड-१९,खरीप पूर्व व पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन केले होते.त्यांच्या अधिकृत दौरा कार्यक्रम पत्रिकेत केवळ बैठकीला उपस्थित असणारात अधिकाऱ्यांची पदनामे नमूद केली आहेत.कोणत्याच लोकप्रतिनिधीचा यात उल्लेख नाही व त्यांच्या वतीने प्रशासनाने देखील कोणालाही बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निरोप दिला नाही.महत्वाच्या विषयांची बैठक असताना त्यात लोकप्रतिनिधींना स्थान दिले नाही याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून  भाजपचे आ.सुजितसिंह ठाकूर,आ.राणाजगजीतसिंह पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी जिल्ह्यातील लोकहिताच्या विविध विषयांच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

आपल्या पत्रातून त्यांनी विविध समस्यांना वाचा फोडली असून जिल्ह्याचे पालक या नात्याने लोकहिताच्या विषयांची कोविड-१९ ,खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सोडवणूक करावी म्हणून साकडे घातले आहे.यात प्रामुख्याने कोरोनाच्या लढ्यात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी  आमदारांच्या स्थानिक विकास निधींतून उपकरणे खरेदीसाठी पत्र दिली असताना अद्याप खरेदी झाली नसल्याचे,जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना अत्यावश्यक वस्तूंचे किट देण्याच्या प्रस्तावाला सरकारने नाकारले व त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे बोट दाखविले असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी,प्रशासनाला कोरोनाच्या लढ्यात मदत व्हावी यासाठी होमगार्ड,निवृत्त सैनिक व अंशकालीन कर्मचारी कामावर घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यावर कसलीच हालचाल झाली नसल्याचे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.

निमंत्रण नसल्याने बैठकीला उपस्थीत राहणे राजशिष्टाचाराला धरून नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या पत्र लिहून मांडत असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात लिहले आहे.याच पत्रात त्यांनी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिकारशक्ती वाढीसाठी ‘Arsenicum Album 30' हे  होमिओपॅथी औषध कोविड निधीतून उपलब्ध करून द्यावे,तुळजापूर ,नळदुर्ग सह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे,खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आंध्र प्रदेश सरकार च्या धर्तीवर थेट आर्थिक मदत देने, या लोकहिताच्या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी मागणी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने समाजातील हातावर पोट असणारे घटक,शेतकरी,बारा बलुतेदार यांना इतर राज्यांच्या धर्तीवर मदत करावी,व्यापारी व उद्योजकांना मदत व्हावी यासाठी कर्नाटक सरकार प्रमाणे पॅकेज द्यावे ,कोरोनामुळे बिघडलेले अर्थकारण सुधारण्यासाठी एक कृतिकार्यक्रम आखणे,उस्मानाबाद जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात कोरोना ड्युटीवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना  रु. ५० लाखांचे विमा संरक्षण कवच देणे,अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देणे या महत्वाच्या विषयांवर राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले असता दुर्दैवाने यापैकी एकाही विषयाला आजपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि  संबंधित सचिवापर्यंत याबाबी योग्य कार्यवाहीसाठी देण्यात आलेल्या नाहीत ही खेदाची बाब असल्याची भावना आपल्या पत्रातून या लोकप्रतिनिधींनि व्यक्त केली असून जिल्ह्याचे पालक या नात्याने आपणच याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी त्यांनी पालकमंत्र्यांना केली आहे

From around the web