खासदार ओमराजे आणि आमदार राणा जगजितसिंह यांच्यात शीतयुद्ध

 
पालकमंत्र्यांच्या आढावा  बैठकीला केवळ सत्ताधारी लोकप्रतिनिधीला निमंत्रण ? 


खासदार ओमराजे आणि आमदार राणा जगजितसिंह यांच्यात शीतयुद्ध

उस्मानाबाद - उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या  उपस्थितीत  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज कोविड-१९,खरीप पूर्व आढावा व पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी  बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना आमदार कैलास पाटील उपस्थित होते, मात्र भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील, सुजितसिंह ठाकूर आदी लोकप्रतिनिधी अनुपस्थित होते. 


या महत्त्वपूर्व बैठकीचे आपणाला निमंत्रण नव्हते, त्यामुळे आपण पालकमंत्र्यांना पत्र लिहून जिल्ह्यातील महत्वाच्या समस्या मांडल्या असल्याचे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले. त्यावर बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर  म्हणाले की, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी निमंत्रण कश्याला हवे, आपण स्वतःहून बैठकीला गेलो होतो, सध्या अडचणीचा काळ असून, हे मानापमानाचे दिवस नाहीत, अशी कोपरखळी मारली. 


आज पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी कोविड-१९,खरीप पूर्व व पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन केले होते.त्यांच्या अधिकृत दौरा कार्यक्रम पत्रिकेत केवळ बैठकीला उपस्थित असणारात अधिकाऱ्यांची पदनामे नमूद केली आहेत.कोणत्याच लोकप्रतिनिधीचा यात उल्लेख नाही व त्यांच्या वतीने प्रशासनाने देखील कोणालाही बैठकीला उपस्थित राहण्याबाबत निरोप दिला नाही.महत्वाच्या विषयांची बैठक असताना त्यात लोकप्रतिनिधींना स्थान दिले नाही याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात असून  भाजपचे आ.सुजितसिंह ठाकूर,आ.राणाजगजीतसिंह पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी जिल्ह्यातील लोकहिताच्या विविध विषयांच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांना पत्र लिहले आहे. त्यामुळे या  बैठकीला केवळ सत्ताधारी लोक प्रतिनिधीला निमंत्रण होते का ? अशी उलट सुलट चर्चा सुरु आहे.  



या संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सध्या संकटाचे दिवस आहेत. लोकांना मदत हवी आहे. त्यांच्या अडचणी आणि समस्या मांडण्यासाठी आपण स्वतःहून बैठकीला गेलो होतो.  माझ्यासोबत उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर होते. उमरगा आमदार ज्ञानराज चौगुले हे लांब असल्यामुळे आले नाहीत. येथे बोलावण्याचा संबंध येतो कुठून ? 

आ. राणा जगजितसिंह पाटील म्हणाले की, लोकप्रतिनिधीला बोलावणे हे अधिकाऱ्यांचे काम आहे. त्यांनी बोलावले नाही तर जाणार कसे ? मात्र आपण पीए मार्फत पालकमंत्र्यांना पत्र लिहून समस्या मांडल्या आहेत. 


पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीला केवळ अधिकाऱ्यांना निमंत्रण

From around the web