Header Ads

भूम : शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य बाजीराव तांबे यांचा खूनभूम -  तालुक्यातील वंजारवाडी पंचायत  समिती गणाचे शिवसेनेचे  विद्यमान सदस्य बाजीराव तांबे यांचा धारधार शस्त्राने निर्घृणपणे खून करण्यात आला आहे.  देवळाली गावात ही घटना घडली असून गावातील ग्रामपंचायत समोरच हा खून करण्यात आला आहे.

 प्रकरण काय?

देवळाली ते वंजारवाडी शेतरस्त्याच्या कारणावरून संशयित आरोपीचे भूम पंचायत समितीचे सदस्य बाजीराव तांबे (वय ४५, रा. देवळाली, ता. भूम) यांच्यासोबत नऊ मे रोजी कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून कारवाई केली होती. जुगार अड्ड्याची माहिती बाजीराव तांबे यांनीच पोलिसांना दिली, असा संशय खून प्रकरणातील संशयित आरोपींनी घेतला होता.


याचा राग धरून चंद्रकांत तांबे, सूर्यकांत तांबे, मधुकर तांबे, रामनाथ तांबे, किरण तांबे, प्रवीण शेटे, अभिजित शेटे, श्रीपती विधाते, प्रकाश गोरे, दिनकर ऊर्फ दिनेश गोरे, भागवत गोरे व चंद्रकांत शेटे (सर्व रा. देवळाली) यांनी मंगळवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान दुचाकीने बार्शीकडे जाणाऱ्या बाजीराव तांबे यांना ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर अडविले. त्यानंतर धारदार शस्त्राने बाजीराव तांबे यांच्या पोटात व हातावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

जखमी बाजीराव तांबे यांना तत्काळ बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु त्यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अपर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक साहेबराव राठोड, पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब बनसोडे आदींसह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

याप्रकरणी बाजीराव तांबे यांचे भाऊ अंकुश कल्याण तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बारा जणांविरोधात परंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक इक्बाल सय्यद तपास करीत आहेत. दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल खांबे, स्थानिक गुन्हा शाखेचे निरीक्षक डी. एम. शेख आदी घटनास्थळी तळ ठोकून आहेत.
पोलीस प्रेस नोट मध्ये काय म्हटले आहे ?

बाजीराव कल्याण तांबे वय 52 वर्षे, रा. देवळाली, ता. भुम हे दि. 26.05.2020 रोजी 20.30 वा. मौजे देवळाली ग्रामपंचायत कार्यालया समोरुन मोटारसायकल चालवत जात होते. यावेळी भाऊबंद- चंद्रकांत तांबे, सुर्यकांत तांबे, मधुकांत तांबे, रामनाथ तांबे, किरण तांबे व अन्य गावकरी- अभिजीत शेटे, श्रीपती विधाते, प्रकाश गोरे, दिनेश गोरे, भागवत गोरे, चंद्रकांत शेटे या सर्वांनी संगनमत करुन देवळाली- वंजारवाडी अशा जाणाऱ्‍या शेतातील रस्त्याच्या वादावरुन बाजीराव तांबे यांना अडवून मारहाण केली. यावेळी सुर्यकांत, मधुकांत व रामनाथ यांच्या चिथावणीवरुन चंद्रकांत तांबे याने धारदार शस्त्र बाजीराव तांबे यांच्या पोटात खुपसून त्यांस ठार केले. अशा मजकुराच्या मजकुराच्या अंकुश कल्याण तांबे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि. कलम- 302, 143, 147, 148, 149, 341 अन्वये गुन्हा दि. 27.05.2020 रोजी नोंदवला आहे.


No comments