डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांचा बेजबाबदारपणा उघडकीस

 
विना परवाना शासकीय वाहनाने  पुणे वारी...

डेप्युटी सीईओ अजिंक्य पवार यांचा बेजबाबदारपणा उघडकीस  

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे  पदाचा दुरुपयोग करून पुण्याला जावून आल्याचे समोर आले आहे. त्यांना  होम क्वारंटाईन होण्याचा आदेश देण्यात आला आहे.  दरम्यान, लॉकडाऊनचे नियम तोडून पुणे वारी करणाऱ्या पवार यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे.     




उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार हे उस्मानाबादच्या बँक कॉलनीमध्ये एका खासगी जागेत भाड्याने राहतात. ते उस्मानाबादेत एकटेच तर त्यांची फॅमिली पुण्यात राहते. लॉकडाऊनमुळे त्यांची घरगुती अडचण झाली आहे.

१७ एप्रिलला ते पुण्याला फॅमिलीला भेटायला गेले होते. २० एप्रिल ( सोमवारी) रोजी पहाटे ते उस्मानाबादेत परत आले. त्यांच्याकडे प्रशासनाचा अधिकृत पास नाही. पदाचा दुरुपयोग करून ते पुण्याला शासकीय वाहनाने जावून आल्याची तक्रार स्थानिक नगरसेवकाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यापूर्वीही ते दोन वेळा पुण्याला जावून आल्याचे या नगरसेवकाचे म्हणणे आहे.


पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट झाले आहे. अजिंक्य पवार हे जबाबदार अधिकारी असले तरी बेजबाबदारपणे वागत असल्याची तक्रार या नगरसेवकाने केली आहे. दरम्यान अजिंक्य पवार यांना होम क्वारंटाईन होण्याचा आदेश देण्यात आला आहे.


अजिंक्य पवार यांच्यावर कडक कारवाई करा - सुभेदार 

अजिंक्य पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी न घेता मुख्यालय सोडले, त्यांनी खासगी कामासाठी शासकीय वाहनाचा गैरवापर केला, शिवाय प्रशासनाचा पास नसताना पदाचा गैरवापर केला आहे. त्यांच्यावर  कडक कारवाई करावी, अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी केली आहे. 

From around the web