सावरगाव परीसरातील १५० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष लागली सडायला ( Video)

द्राक्ष उत्पादकांना लाखो रुपयांचा फटकासावरगाव -  कोरोना विषाणूमुळे सलग एक महिना लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. कोरोनाचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. काढणीला आलेली द्राक्ष शेतात सडत आहेत. संचारबंदीमुळे द्राक्षाची विक्री होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनीही द्राक्षे खरेदीला पाठ फिरवली आहे,त्यामुळे  द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे  नुकसान होत आहे.

दिल्ली , कर्नाटक , आंध्र प्रदेश,  तमिळनाडू , ओरिसा,  आनंतपुरम , पश्चिम बंगाल,  राज्यातील व्यापारी दरवर्षी सावरगाव (ता. तुळजापूर ) परिसरात द्राक्ष खरेदीला येतात , यंदा मात्र कोरोना विषाणूमुळे व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी बंद केली आहे. द्राक्ष वाहतूक करण्यासाठी प्रशासनाने वाहनांना परवानगी दिल्याने दोन -तीन  दिवसापासून काही स्थानिक व्यापाऱ्यांनी द्राक्षे खरेदी सुरू केली, मात्र दर घसरल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्किल झाले आहे.

या वर्षी द्राक्ष उत्पादकांना बाजारपेठेत चांगला दर मिळेल, अशी अशा होती पण उलट परिस्थिती झाली आहे.  द्राक्षाचे दर पडले आहेत. कवडीमोल किंमतीने मागणी होत आहे.  त्यामुळे अनेकांनी बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्ष काढणीला सुरुवात केली आहे पण शेड नसल्याने सांगली जिल्ह्यात आणि सांगोला तालुक्यात बेदाणा प्रकल्पात द्राक्ष पाठवण्याच्या  हालचाली  सुरू झाल्या आहेत. सावरगाव परिसरातील  १५० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष उत्पादकांना  कोट्यवधीचा  फटका बसला आहे.

दुष्काळत तेरावा महिना कोरोना 

सावरगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी  रविकिरण विजय पाटील यांची सुपर सोनाका वाणाची तीन एकर द्राक्ष बाग दि.१७ मार्च रोजी अवकाळी पावसाने जमीनदोस्त होवून  ४० लाखांचे ,  तर रामेश्वर किसन तोड़करी यांची दि.२४ मार्च रोजी अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याने अडीच  एकर आरके द्राक्ष  वाणाच्या बागेचे ३५ लाखांचे नुकसान झाले आहे.  कोरोनाच्या संकटामुळे द्राक्ष उत्पादकाचे कंबरडे मोडले असताना निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादकांच्या जीवनात 'दुष्काळात तेरावा महिना' आला आहे.


बाजारपेठेतून द्राक्ष आणली माघारी...

सावरगाव येथील बाळासाहेब शिंदे  यांनी टाटा एस टेम्पो मधून १०० कॅरेट द्राक्ष  उस्मानाबाद येथे  विक्रीसाठी नेली होती परंतु मागणीपेक्षा जास्त द्राक्षाची आवक वाढल्याने व्यापाऱ्यांनी माल उतरून न घेता  द्राक्ष माघारी पाठवला.द्राक्षाची  विक्री  न झाल्याने त्यांनी  वावरात वाळत टाकली आहेत.  शिंदे  यांच्याप्रमाणे असंख्य शेतकऱ्यांसमोर काढणीला आलेली द्राक्ष कुठे खपवायची ?  हा प्रश्न  निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ 

No comments