Header Ads

नळदुर्गमध्ये गांजा प्रकरणातील आरोपीवर दुधाचा अभिषेक 

वाढदिवसानिमित मटण पार्टी , सात जणांवर गुन्हा दाखल
नळदुर्ग - लॉकडाऊनचे नियम तोडून तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग मध्ये भर चौकात एका गांजा प्रकरणातील आरोपीवर वाढदिवसानिमित्त दुधाचा अभिषेक करण्यात आला, तसेच त्याच्या  शेतात  चाहत्यांना  मटणाची पार्टी देण्यात आली. त्याची छायाचित्रेही  सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पोलिसांनी मिठू ठाकूर यास अटक करून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


तुळजापूरजवळील एका कारमध्ये सापडलेल्या गांजा प्रकरणी काही दिवस अटकेत असलेल्या मिठू उर्फ इंद्रजित ठाकूर याचा आज वाढदिवस होता, लॉकडाऊन असताना हा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा कऱण्यात आला. रात्री बारा वाजून १ मिनिट झाल्यानंतर  काही जणांनी त्याच्यावर भर चौकात दुधाचा अभिषेक केला. तसेच आज वाढदिवसानिमित्त त्याच्या शेतामध्ये चाहत्यांना मटण पार्टी  देण्यात आली. यावेळी किमान ५० ते ६० जण जमले होते. याचवेळी पोलिसांनी छापा मारून सात जणांना पकडले असून बाकी पळून गेल्याचे समजते.  याप्रकरणी मिठू उर्फ इंद्रजित ठाकूर याच्यासह सात जणांविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी कार आणि काही गाड्या जप्त केल्या आहेत. 


एकीकडे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून शासन, प्रशासन, पोलीस, आरोग्य यंत्रणा रात्रंदिवस काम करत असताना, काही गुंड प्रवृत्तीचे लोक लॉकडाऊनचे नियम तोडत आहेत. पोलिसांनी अश्या गुंडाच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मिठू ठाकूर याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 


पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ही कारवाई केली पण रात्री १२ वाजता भर चौकात दुधाचा अभिषेक सुरु असताना नळदुर्ग पोलीस नेमके कुठे होते ? त्यांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न नळदुर्गकरांना पडला आहे.

 गर्दी करुन वाढदिवस साजरा केला, 2 गुन्हे दाखल

 इंद्रजित रणजितसिंग ठाकुर उर्फ मिठु रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर याने आपला वाढदीवस साजरा करण्यासाठी दि. 20.04.2020 रोजी 00.30 वा. सु. स्वत:च्या घरा समोर 7 व्यक्ती एकत्र केल्या. या प्रसंगी त्याने दुधाने अंघोळ करत असल्या बाबतचा व्हिडीओ सामाजिक माध्यमांवर प्रसिध्द केला.

त्या नंतर त्याने वाढदीवसाची पार्टी दि. 21.04.2020 रोजी 15.00 वा. सु. मौजे मुर्टा येथील आपल्या शेतात ठेउन 1)विश्वजित ठाकुर 2)सौरभ गहेरवार 3)सुरर्शन जाधव 4)महेश हजारे 5)अमहद कुरेशी 6)रोहीत राठोड 7)संग्राम ठाकुर 8)दादा शिंदे 9)बालाजी कांबळे 10)सुरज मस्के सर्व रा. नळदुर्ग यांना पार्टीस बोलावले. 

हि पार्टी चालू असतांना वरील सर्व पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले. त्यांच्या ताब्यातून घटनास्थळी एक कार, पाच मोटारसायकल व वाढदिवसाचे साहित्य असा एकुण 10,45,300/-रु. साहित्य जप्त केले आहे. अशा प्रकारे त्यांनी कोरोना विषाणु चा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना- आदेशांचे उल्लंघन करुन, एकमेकांत सुरक्षीत अंतर न ठेवता, नाका- तोंडास मास्क न लावता स्वत:ची व इतरांची सुरक्षीतता धोक्यात आणली. यावरुन पो.ठा. नळदुर्ग चे सपोनि श्री. वानखेडे, यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वरील आरोपींविरुध्द 2 स्वतंत्र गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पाहा व्हिडीओ 
नळदुर्गमध्ये गांजा प्रकरणातील आरोपीवर दुधाचा अभिषेक वाढदिवसानिमित मटण पार्टी , सात जणांवर गुन्हा दाखल https://www.osmanabadlive.com/2020/04/osmanabad-tuljapur-naldurg-Cannabis-accused-Birthday.html
Posted by Osmanabad Live on Tuesday, April 21, 2020

No comments