उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ बिअर बार व परमिट रूमचे परवाने कायमस्वरूपी रद्दउस्मानाबाद :  लॉकडाऊनचा आदेश झुगारून मद्यविक्री करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ बिअर बार व परमिट रूमचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केली आहे. शासनाच्या नियमांचे पालन न करणाऱ्या बिअर बार दुकानदारांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कायमस्वरूपी परवाने रद्द केल्याने खळबळ माजली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारचे देशी, विदेशी परवाने असलेली मद्यविक्रीची दुकाने या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यातील सर्व बिअर बार दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली होती. दरम्यानच्या काळात ‘ड्राय-डे’ असतानाही चोरून मद्याची विक्री होत असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे.

पोलिसांनी गैरमार्गाने मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवर छापे मारून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्याची कारवाई केलेल्या मद्यविक्रीच्या दुकानाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने चौकशी केली असता परराज्यातील मद्यविक्री करणे, मद्यविक्रीच्या नोंदी न ठेवणे, लॉकडाऊनचा आदेश झुगारणे आदी बाबी उघडकीस आल्याचा प्रकार समोर आला आहे.

लॉकडाऊन काळात मद्याच्या पासेसच्या नोंदी न ठेवणे, परराज्यातील व गोवा निर्मित मद्यविक्री करणे, शासनाच्या नियमांचे व अटींचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील घोगरेवाडी येथील हॉटेल पृथ्वीराज बिअर बार, बेंबळी येथील हॉटेल अरुणचंद्र बिअर बार, ढोकी येथील हॉटेल शिरीन व सूर्या बिअर बार, कळंब तालुक्यातील शिराढोण येथील हॉटेल भक्ती बिअर बार, उमरगा तालुक्यातील डिग्गी रोड येथील हॉटेल प्राची, भूम येथील हॉटेल सचिन बार व लोहारा येथील जट्टे बिअर शॉपीचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात यापुढे जे बार व परमिट चालक नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अशाच स्वरूपाची कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक केशव राऊत यांनी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने बारचालकांत खळबळ उडाली आहे.

No comments