Header Ads

गोरगरीब कुटुंबाला दानशूर व्यक्तींचा मदतीचा हात

एक लाख २० हजारांचे किट्स लोकवर्गनीतून वाटप 


बेंबळी - लॉकडाऊनच्या कालावधीत गरीब कुटुंबांचे हाल होऊ नयेत, यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी दक्षता समितीने दानशूर व्यक्तींच्या मदतीने किराणा साहित्याचे ४०० किट वाटप करण्यास प्रारंभ केला आहे. एक लाख २० हजारांचे किट्स लोकवर्गनीतून उपलब्ध केले असून उपविभागीय पोलिस अधिकारी मोतीचंद राठोड यांच्या हस्ते सोमवारी या उपक्रमास प्रारंभ झाला.

यानिमित्त सोशल डिस्टनिंग पाळून आयोजित कार्यक्रमास बेंबळीचे सहायक पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख, माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

 गेले आठ दिवस घरोघरी सर्वेक्षण करून ४०० लाभार्थींची निवड करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी बेंबळी दक्षता समितीच्या मदतीने समितीतील दानशूर व्यक्ती, नोकरदार, व्यावसायिकांनी या उपक्रमास हातभार लावला आहे. त्यामुळे या उपक्रमाला व्यापक स्वरूप आले असून. पहिल्या दिवशी जवळपास ७० गरीब कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले. यात साखर, तूर व मसूर डाळ, साबण, चहापत्ती आदी ११ प्रकारचे साहित्य या किटमध्ये समाविष्ट आहे.

लॉकडाऊन व संचारबंदीच्या नियमांचे पालन होण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उर्वरित लाभार्थ्यांना दक्षता समितीकडून वेगवेगळी तारीख आणि वेळ नमूद असलेले कुपन दिले जात आहेत. त्यामुळे वाटप सुरळीत होत आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी राठोड यांनी समितीने अशा प्रतिकूल काळात गरिबांना किराणा किट देऊन जगण्याला आधार दिला आहे, असे नमूद करून चांगल्या उपक्रमास पोलिस प्रशासनही सहकार्य करेल असे सांगितले. यावेळी दक्षता समितीचे दिनेश हेड्डा, गालिबखान पठाण, सुनिल वेदपाठक, अमर कटके, शितलकुमार शिंदे, नितीन खापरे पाटील, दिनेश हेड्डा, श्रीकृष्ण खापरे पाटील, इरफान जमादार, नंदकुमार मानाळे, शाम पाटील, रणजीत बर्डे, सचिन व्हनसनाळे, विद्याताई माने, बालाजी माने, अतीक सय्यद, गुड्डू सोनटक्के, सिध्दनाथ रेडेकर, गोविंद पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

No comments