Header Ads

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाबरोबर पाणी टंचाईचे संकटउस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबरोबर पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहे.  जिल्ह्यातील तीन गावे, एका  वाडीला चार टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात येत आहे. आगामी काळात पाणीटंचाई जाणवणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील सर्व २२३ प्रकल्पांमधील पाणीपातळीत दर आठवड्याला घट होत असून, सध्या या सर्व प्रकल्पांमध्ये १३.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

. जिल्ह्यात २०१९ मध्ये पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात बऱ्यापैकी वाढ झाली होती. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या मध्यापासून काही गावांना पाणीटंचाई जाणवण्यास सुरवात झाली आहे. २०१८ मध्ये अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे त्यावेळी डिसेंबर २०१८ पासूनच काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला.गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात अधिग्रहण आणि टँकरने पाणीपुरवठा अनेक गावांना करावा लागला होता. यंदा एप्रिलच्या मध्यापासून जिल्ह्यातील तीन गावे, एका वाडीला चार टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी, परंडा तालुक्यातील वडनेर, कात्राबाद, खासगाव या गावांना सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. यासाठी तीन गावे व एका वाडीला टँकरच्या नऊ खेपा मंजूर आहेत. सध्या उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने टँकर आणि अधिग्रहणाची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येत वाढ होण्याचे संकेत आहेत.

१९ लघुप्रकल्प कोरडे 

जिल्ह्यात एक मोठा, १७ मध्यम आणि २०५ लघुप्रकल्प मिळून एकूण २२३ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत सध्या १३.११ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. आतापर्यंत १९ लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. फक्त एका लघुप्रकल्पात शंभर टक्के, एक लघुप्रकल्पात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक, दोन मध्यम व सहा लघुप्रकल्प मिळून आठ प्रकल्पांत ५१ टक्क्यांपेक्षा अधिक, तीन मध्यम व ४६ लघुप्रकल्प मिळून ४९ प्रकल्पांत २६ ते ५० टक्के, सात मध्यम व ६५ लघुप्रकल्प मिळून ७२ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे.

एक मोठा, पाच मध्यम व ६७ लघुप्रकल्प मिळून ७३ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. १९ लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. मध्यम प्रकल्पांत १८.८१, लघुप्रकल्पांत १२.७६ टक्के मिळून सरासरी १३.११ टक्के पाणीसाठा सध्या या प्रकल्पांमध्ये शिल्लक आहे. एप्रिल २०१९ मध्ये या सर्व प्रकल्पांत केवळ ३.१६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक होता.

सध्याची उन्हाची तीव्रता लक्षात घेता, येत्या काही दिवसांत टँकर व अधिग्रहणाद्वारे पाणीपुरठा करावा म्हणून जिल्ह्यातील गावांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

No comments