राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाचा लॉकडाऊनमध्ये प्रवासपुणे -  लॉकडाऊनमध्ये वाधवान कुटुंबाने केलेला प्रवास चर्चेत असताना, तसाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराच्या भावाने प्रांताधिकाऱ्यांचं कथित पत्र दाखवून पुणे-मुंबई असा प्रवास केला. मात्र प्रांताधिकाऱ्यांनी हे पत्र आपण दिलंच नसल्याचं स्पष्ट केल्याने, या प्रकरणातील गांभीर्य वाढलं आहे.


राष्ट्रवादी काँग्रसचे विधानपरिषदेचे आमदार अनिल भोसले सध्या येरवडा जेलमध्ये आहेत. शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत ७१ कोटी ७८ लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.याच अनिल भोसले यांचा भाऊ नितीन भोसले यांनी ८ एप्रिल रोजी पुणे-मुंबई असा प्रवास केला होता. आपल्या नातेवाईकाला घेऊन त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर ते मुंबईमधील वांद्रे पूर्व इथपर्यत हा प्रवास केला. महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास करण्यासाठी मावळचे प्रांताधिकारी संदेश शिर्के यांचं पत्र उपलब्ध होतं असा दावा त्यांनी केला आहे. या पत्रात चौघेजण प्रवास करत असून गरज लागल्यास त्यांना पेट्रोल, डिझेल पुरवण्यात यावं अशी स्पष्ट माहिती लिहिण्यात आली होती. तसंच गाडीचा क्रमांकही देण्यात आला होता. पण संदेश शिर्के यांनी आपण असं पत्र दिलं नसल्याचं म्हटल्याने प्रकरण तापण्याची शक्यता आहे.

“आपण हे पत्र दिलेले नाही. मी केलेल्या स्वाक्षरीचा स्कॅन करुन गैरवापर करण्यात आला आहे. जो कर्मचारी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,” असं संदेश शिर्के यांनी सांगितलं आहे.

आमदार अनिल भोसले कारागृहात

राष्ट्रवादी विधानपरिषदेचे आमदार असलेले अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळाप्रकरणात येरवडा जेलमध्ये आहेत. अनिल भोसले, त्यांची नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

 या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल भोसले यांच्यासह त्याचं पत्नी आणि इतर १६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

No comments