वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

 
वाधवान बंधू सीबीआयच्या ताब्यात

मुंबई - डीएचएफएलचे प्रवर्तक आणि   Yes  बँक घोटाळ्यातील संशयित आरोपी धीरज आणि कपिल वाधवान यांना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं आहे.  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची माहिती दिली.

राज्यात करोनामुळे लॉकडाउनची कडक अंमलबजावणी केली जात असताना डीएचएफएलचे प्रवर्तक कपिल वाधवान यांचं प्रकरण समोर आलं होतं. राज्याच्या गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांचं शिफारस पत्र घेऊन वाधवान यांच्या कुटुंबीयांसह २३ जण लॉकडाउनच्या काळात प्रवास करून महाबळेश्वरला गेले. तेथे पाचगणी पोलिसांनी या सगळ्यांना अटक केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. त्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.  

साताऱ्यात असलेल्या वाधवान कुटुंबियांचा क्वॉरन्टाईन काळ 23 तारखेला संपल्यानंतर अखेर आज धीरज आणि कपिल वाधवान या बंधूंना सीबीआयने आपल्या ताब्यात घेतलं आहे. सीबीआयने सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतलं असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करत दिली आहे. वाधवान कुटुंबाचा क्वॉरन्टाईन काळ संपल्यानंतर आम्ही ईडी आणि सीबीआयला पत्र लिहून त्यांचा ताबा घेण्याची विनंती केली आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी 22 एप्रिलला दिली होती. अखेर आज वाधवान बंधूंना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे.  

दरम्यान, येस बँक प्रकरणात चौकशीसाठी हवे असलेले दिवाण हौसिंग फायनान्स लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान तसेच त्यांचे बंधू धीरज वाधवान यांना विलगीकरणानंतर आपल्याला कळविल्याशिवाय सोडण्यात येऊ नये, असे पत्र केंद्रीय गुप्तचर विभागाने साताऱ्याचे जिल्हा न्यायाधीश तसेच पोलीस अधीक्षकांना पाठविले होते. वाधवान यांचं विलगीकरण पूर्ण झाल्यानंतर आज सीबीआयच्या विशेष पथकानं त्यांना सातारा पोलिसांकडून ताब्यात घेतलं. गृहमंत्री देशमुख यांनी याची माहिती दिली.  

From around the web