अभिनेता इरफान खान यांचं मुंबईत निधन

 
अभिनेता इरफान खान यांचं  मुंबईत निधन

मुंबई  - आपल्या दमदार अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा अभिनेता इरफान खानचे बुधवारी निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खान यांला न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाचा आजार होता.


चित्रपट निर्माते शूजित सरकार यांनी इरफान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी ट्वीट करुन इरफान खान यांचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यांनी लिहिलं आहे की, "माझा प्रिय मित्र इरफा... तू लढलास. मला तुझा अभिमान आहे. आपण पुन्हा भेटू. स्तुपा आणि बाबिल यांचं सांत्वन.. तुम्ही सुद्धा लढलात. या लढाईत तू शक्य तेवढं केलंस. तुझ्या आत्म्याला शांती मिळो...इरफान खान सलाम."

इरफान खानने मार्च २०१८ मध्ये कॅन्सर झाल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर त्याने सर्व कामं थांबवली होती आणि उपचारासाठी लंडनला निघून गेला होता. २०१९ मध्ये परतल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं. चित्रपटातील अभिनयासाठी इरफान खानचं कौतुक करण्यात आलं होतं. सोबतच पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्याबद्दल आनंदही व्यक्त केला होता. १३ मार्च २०२० रोजी अंग्रेजी मीडियम चित्रपट रिलीज होणार होता. मात्र लॉकडाउनमुळे ६ एप्रिल रोजी डिजीटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यात आला. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘पानसिंग तोमर’, ‘द लंचबॉक्स’, ‘हैदर’, ‘गुंडे’, ‘पिकू’, ‘तलवार’, ‘हिंदी मीडियम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या होत्या. जवळपास ३० वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने ५० हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं. बॉलिवूडसोबतच त्याने हॉलिवूडमध्येही छाप सोडली. कलाक्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीसाठी २०११ मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता.

From around the web