अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही - उद्धव ठाकरे

 
अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही - उद्धव ठाकरे

कोरोनाच्या या लढाईत काही विकृती समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान फेक व्हिडीओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका.  कोविडपासून महाराष्ट्राला वाचवणारच. मात्र दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला.फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला.


खोटे आणि उगाचच अफवा पसरवणारे दोन समाजांमध्ये दुहीचा व्हायरस पसरवणारे व्हिडीओ कुणी गंमत म्हणूनही पसरवत असेल तर त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही. नोटांना थुंकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. ज्यामुळे दोन समजांमध्ये तेढ निर्माण होते. असं गंमत म्हणूनही कुणी करत असेल तरीही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

आपली जात, देश, धर्म कुठलाही असो, व्हायरस मात्र एकच आहे. आपण कोरोनासोबत लढा देत आहोत. या लढाईत डॉक्टर, नर्सेससोबत काही विकृती गैरवर्तन करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा विकृतींची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.


महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. जगभर धुमाकूळ या व्हायरसने घातला आहे. या केसेसमध्ये आपण रुग्ण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. काळजी करु नका कारण ५१ लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे हेदेखील लक्षात घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सर्व धर्मियांनी आपले सण, उत्सव घरातच साजरे करा, असं आवाहन त्यांनी केलं. मुख्यमंत्री म्हणाले की,  तबलिगींचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही. दिल्लीवरुन मरकजमधून आलेले 100 टक्के लोक सापडले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं.

सगळेजण जात-पात-धर्म-पंथ विसरुन करोनाशी लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत. अनेक संस्था जेवणाचं वाटप करत आहेत. अनेक हॉटेल्सनी मदतीचा पुढाकार घेतला आहे. सिंहाचा नाही तर खारीचा वाटा सगळेजण उचलत आहेत. मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आहे. धन्यवाद, विनंती हे सगळे शब्द संयम पाळणाऱ्या सगळ्यांसाठी आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

किराणा, भाजी घेण्यासाठी गर्दी नको

किराणाची दुकानं, भाजी बाजार आम्ही २४ तास सुरु ठेवली आहेत. तिथे जाऊन गर्दी करु नका. करोनासमोर गुडघे टेकू नका. त्याला आपल्याला हरवायचं आहेच हे लक्षात घ्या. संयम पाळलात तर आपण त्याला हरवू शकतो. त्यामुळे भाजी घ्यायला जाताना, किराणा घ्यायला जाताना गर्दी करु नका असं आवाहन मी हात जोडून आपल्याला करतो आहे. तसंच करोनाला हरवायचं असेल तर स्वयंशिस्त आणि संयम महत्त्वाचा आहे हे विसरु नका असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

‘वर्क फ्रॉम होम’ शक्य असणाऱ्यांनी घर सोडू नका

ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य आहे त्यांनी अजिबात घर सोडू नका. त्यांनी घरुनच काम करा अशीही विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. इतकंच नाही तर संयम पाळणं खूप आवश्यक आहे. या संयमानेत आपल्याला करोनाशी लढा द्यायचा आहे आणि या व्हायरसला हरवायचं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.


From around the web