Header Ads

नारायण समुद्रे यांचे अपघाती निधन


ढोकी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण समुद्रे ( वय ६५  ) यांचे सोमवारी रात्री अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रकट केला आहे, समुद्रे यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नारायण समुद्रे हे सोमवारी दुपारी आपल्या शेताकडे कारने गेले होते. रात्री ९ वाजता घरी परतत असताना, त्यांची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली, त्यात ते गंभीर जखमी झाले. सोमवारी  रात्री उशिरा उपचारासाठी उस्मानाबादच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. 

नारायण समुद्रे हे तेरणा साखर कारखान्याचे संस्थापक कै. किसन तात्या समुद्रे यांचे पुत्र होते. त्यांनी ढोकी ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद, ढोकी गटाचे जिल्हा परिषद सदस्य, विद्यमान ढोकी सेवा संस्थेचे अध्यक्ष ते जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, तुळजाभवानी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद अशी अनेक पदे भूषवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, भावजयी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, पुतणे, सुना, नातवंडे असा परिवार असून ढोकीचे उपसरपंच अमोल अनंतराव समुद्रे यांचे ते चुलते होत.

'आप्पा' म्हणून परिचित असलेले नारायण समुद्रे  हे मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक प्रकट केला आहे.मंगळवारी (दि.२१) त्यांच्यावर ढोकी येथील स्मशानभूमीत मोजक्या लोकांच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्यांच्या निवासस्थानी सामाजिक अंतर राखत खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार राणा जगजितसिंह पाटील, आमदार कैलास पाटील, सुभाष देशमुख, संजय निंबाळकर, विश्वास शिंदे तसेच नातेवाईक व नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले.

एक योद्धा काळाच्या पडद्याआड गेला ... 


उस्मानाबादच्या राजकारणाचा  जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा नारायण आप्पाची संघर्षातील सेनापती म्हणून नोंद केली जाईल... सच्चे मित्र ,खुल्या मनाचा सहकारी आज आमच्यातून निघून गेला, ही उणीव कधीच भरून निघणार नाही.  हा अनपेक्षित आघात आहे.   
नारायण आप्पा समुद्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली... 
- खलील सय्यद सर, उस्मानाबाद 

1 comment

Unknown said...

Appa chya akali nidhnane Dhoka ani parisaratil Janteche na bharun nighnare nuksan zale ahe.