Header Ads

अणदूरमधून चोरीस गेलेल्या मोटारसायकली भिवंडीत सापडल्या

तीन चोरटे गजाआड, आठ मोटारसायकली जप्त 


भिवंडी / अणदूर : तुळजापूर  तालुक्यातील अणदूर  आणि परिसरातील मोटारसायकली चोरून भिवंडीत विकणाऱ्या चोरट्यांच्या एका टोळीस पकडण्यात  कोनगाव पोलिसांना यश आले आहे. तीन चोरट्यांना गजाआड कऱण्यात आले असून, आठ  मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. 

अणदूरचे पत्रकार सुदर्शन मोकाशे यांच्या घरासमोरून त्यांचे बंधू संदीप मोकाशे  यांची जवळपास ७५ हजार रुपयांची बुलेट ( क्रमांक एम.एच. १३, बी वाय ८८८८)  ४ जानेवारी रोजी चोरीस गेली होती. याप्रकणी नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यानंतरही अणदूर येथून अनेकांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या होत्या. 


अणदूर मधील मोटारसायकल चोरणारे चोरटे आळंद परिसरातील असून एक टेम्पो घेऊन चोरीच्या मोटारसायकली भिवंडी परिसरात नेवून विकत असल्याचे उघडकीस आले आहे.  कोनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिजित पाटील यांनी मोकाशे यांना फोन करून बुलेट सापडल्याची माहिती दिली, त्यानंतर मोकाशे यांनी अडीच महिन्यानंतर बुलेट सापडल्याबद्दल आनंद  व्यक्त केला आणि पोलिसांचे सोशल मीडियावर अभिनंदन केले.

भिवंडीतील कोनगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीचा छडा लावला असून,  तीन चोरट्यांना गजाआड केले असून, आठ  मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या टोळीमध्ये आणखी काही चोरटे असून, पोलीस निरीक्षक अभिजित पाटील अधिक तपास करीत आहेत.

उस्मानाबादच्या पोलिसांनी या चोरट्यांना ताब्यात घेऊन उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या मोटारसायकलीचा छडा लावावा, अशी मागणी होत आहे. 
No comments