CAA : कोरोनामुळे उस्मानाबादचे आंदोलन तात्पुरते स्थगित

 
 CAA : कोरोनामुळे उस्मानाबादचे  आंदोलन तात्पुरते स्थगित

उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा फटका उस्मानाबादेत गेल्या ४४ दिवसापासून  सुरु असलेल्या आंदोलनाला बसला आहे. सीएए कायद्याला स्थगिती द्यावी आणि एनआरसी लागू करू नये,  या मागणीसाठी  संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु होते, कोरोनामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

उस्मानाबादेत ३ फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरु होते. या आंदोलनात मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. दररोज किमान ८० ते १०० नागरिक उपोषणात सहभागी होत होते. त्याला भाजप सोडून अन्य पक्षातील नेत्यांनी पाठींबा दिला होता. मुस्लिम समाजातील महिलाही एक दिवस उपोषणास बसल्या होत्या. 

जोपर्यंत सीएए कायदा रद्द होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहणार असल्याची भूमिका   संविधान बचाव संघर्ष समितीच्या संयोजकांनी घेतली होती. मात्र मध्येच कोरोनाचे संकट उदभवले आहे. प्रशासनाने आंदोलन करण्यास मनाई केली आहे. तसा आदेशही लागू केला आहे. त्यामुळे हे आंदोलन  तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. 


जेव्हा कोरोनाचे संकट दूर होईल, तेव्हा परत याच मागणीसाठी साखळी उपोषण सुरु करण्यात येईल. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे, प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून हे आंदोलन   तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
- मसूद शेख, संयोजक 




From around the web