Header Ads

मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात

कर्मचाऱ्यांच्या पगारालाही कात्री

मुंबई - करोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळेच  मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात ६० टक्के कपात करण्यात आली आहे तर  कर्मचाऱ्यांच्या पगारालाही कात्री लावण्यात आली आहे. 
 आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व  लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
राज्यातील लोकप्रतिनिधींबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातही कपात करण्यात आली आहे. यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५० टक्के कपात करण्यात आली आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना ७५ टक्के वेतन दिले जाणार आहे. सरकारनं ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. या वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन सरकारनं हा निर्णय घेतला आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

1 comment

Unknown said...

All banks should also reduce the loan installment amount by same %. It's a kind request by us all common people who took loan for all different purposes.