Header Ads

कोरोनाचा धसका : लोकांनी शेत गाठले !

 शेतातही लावला प्रवेश बंद फलक !

अणदूर - स्वातंत्र्यपूर्व काळात प्लेगची साथ सुरु झाल्यानंतर लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गाव सोडून  शेत गाठले होते. आता शंभर वर्षानंतर कोरोनाची साथ सुरु झाल्यानंतर लोकांनी पुन्हा शेत गाठण्यास सुरुवात केली आहे. 

कोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगात हाहाकार उडाला आहे. अमेरिका, जर्मनी, इटली सारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. इटलीमधील मृतांचे आकडे पाहून लोकांचा थरकाप उडत आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा विळखा वाढत चालला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आजमितीस ११६ वर संख्या गेली आहे. त्यामुळेच देशभर २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा  एकही पॉजिटीव्ह रुग्ण अद्याप आढळलेला नाही, मात्र जिल्ह्यातील लोकांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाघोली गावातील लोकांनी बांबू आणि काटेरी झुडपे लावून बाहेरगावहून येणारा रस्ता बंद केला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक लोक शेतावर राहण्यास जात आहेत. 

तुळजापूर तालुक्यातील अणदूरमधील काही लोक शेतावर राहायला गेले  असून, शेतात सुद्धा प्रवेश बंद असा फलक लावत आहेत. एकंदरीत लोकांनी कोरोनाचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. No comments