पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील सिस्टरला थेट नरेंद्र मोदींचा फोन !

 
पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमधील सिस्टरला थेट नरेंद्र मोदींचा फोन !

पुणे : "तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना, कोरोनाचे पेशंट हाताळताना तुमच्या नेमक्या काय भावना असतात,  तुम्ही हे काम करीत असल्याने तुमचे कुटुंबीय चिंतेत तर नाहीत ना, नीट काळजी घ्या, आपण सर्वजण मिळून कोरोनाला देशातून घालवूयात," अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील नायडू हॉस्पिटलमधील नर्स छाया जगताप यांची फोनवरून विचारपूस केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या नायडू हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या छाया सिस्टला फोन केला आणि त्यांचं कौतुक केलं. सगळा देश तुमचा कृतज्ञ आहे असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांच्या कौतुकाने छाया सिस्टर भारावून गेल्या आहेत.

काय सिस्टर कश्या आहात? असा प्रश्न मोदींनी त्यांना मराठीतूनच विचारला. तुम्ही काळजी घ्या, तुमच्या कुटुंबीयांचीही काळजी घ्या असं ते सिस्टर छाया यांना म्हणाले. तुम्ही अतिशय चांगलं काम करत आहात. तुमचे अनुभव कसे आहेत  असंही त्यांनी छाया यांना विचारलं. त्यानंतर छाया यांनी त्यांचे अनुभव पंतप्रधानांना सांगितले.आम्ही आमचं कर्तव्य करत आहोत. तुम्ही सगळ्या देशाचा कारभार बघता, एवढे व्यस्त असुनही तुम्ही फोन करून आम्हाला धीर दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद असं छाया सिस्टर पंतप्रधानांना म्हणाल्या.

पंतप्रधान कार्यालयातून शुक्रवारी रात्री पावणेआठच्या सुमारास छाया यांना मोदींचा फोन आला आणि त्यांनी नर्सेसचे काम कसे सुरू आहे, याची माहिती घेत रुग्णालयातील नर्सेसची विचारपूस केली त्यांना धीर दिला. पंतप्रधान मोदी यांनी मराठीत 'तुम्ही स्वतःची काळजी नीट घेतात ना', असे विचारून संभाषणाला सुरुवात केली. तुम्ही एवढ्या जोखमीच्या ठिकाणी काम करत आहात मग तुमच्या परिवाराला तुमच्याविषयी काळजी वाटत असेल ना, असेही मोदी यांनी विचारले.

याशिवाय जेव्हा रुग्णालयात पेशंट येतात तेव्हा ते घाबरलेले असतात का? त्यांच्याशी तुम्ही कसा संवाद साधता, पेशंटला कसा धीर देता, त्यांच्यातील भीती कशी घालता आणि तुम्ही आपल्या स्वतःच्या परिवाराला ही कसे आश्वस्त करता, अशी चौकशीही पंतप्रधान मोदी यांनी केली.  पेशंटची भीती घालवण्यासाठी नर्सेस काय करतात याची माहिती छाया यांनी पंतप्रधानांना दिली. देशभरात हजारो नर्सेस या रोगाचा सामना करण्यासाठी काम करत आहेत, त्या सर्वांना शुभेच्छा देत मोदी यांनी त्यांचे आभारही मानले. छाया यांनीही पंतप्रधानांना तुम्ही आवर्जून फोन केला, याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
छाया जगताप या नायडू रुग्णालयात गेल्या वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. स्वाईन फ्लूच्या काळातही त्यांनी अनेक पेशंट हाताळले आहेत. "आमच्या घरच्यांना आमच्याविषयी खरोखरीच चिंता असते, पण आम्ही पूर्ण काळजी घेऊन काम करत असतो. कुठल्याही पद्धतीने संसर्ग होणार नाही याची दक्षता घेतो, असे छाया यांनी  सांगितले.

नायडू हॉस्पिटलमध्ये सात रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर सध्या नऊ रुग्ण उपचार घेत आहेत, त्या सर्वांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनाही लवकरच डिस्चार्ज मिळेल, असेही त्या म्हणाल्या. हॉस्पिटलच्या वतीने इथला सर्व कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स आणि नर्सेस यांची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नायडू हॉस्पिटलमधील सिस्टर छाया यांच्यात झालेला संवाद ऐका 


From around the web