‘कोरोना’वर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शोधला गावठी उपाय

 
‘कोरोना’वर उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शोधला गावठी उपाय
उस्मानाबाद – कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला असताना उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात अजब प्रकार घडला आहे. कोरोना विषयी माहिती देण्यासाठी एकीकडे जिल्हाधिकरी दीपा मुधोळ -मुंडे यांची पत्रकार परिषद सुरु असताना, दुसरीकडे  कोरोनाला  पळवण्यासाठी धूप म्हणून शेणाच्या गोवऱ्या जाळण्यात आल्या. त्यावर कापूर आणि विविध वनस्पती टाकून धूर करण्यात आला होता. 
आयुर्वेदाचा हवाला देत जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोरच हे शेणाच्या गोवऱ्या व धूप जाळण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.आयुर्वेदाचा हवाला देत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमोर  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रात्यक्षिक केल्याचा दावा  आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने केला आहे. 
उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधाबाबत प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकरी दीपा मुधोळ मुंडे यांनी गुरुवारी दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, यावेळी जिल्हाधिकारी हॉलमध्येच आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या एका प्राध्यापकाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  शेणाच्या गोवऱ्या जाळून त्यावर कापूर आणि विविध वनस्पती टाकून धूप तयार केले आणि यामुळे संसर्ग कमी होतो असा अजब दावा केला. या प्रकारामुळे उपस्थित पत्रकार चक्रावून गेले होते.
हा सगळा प्रकार पाहून सिव्हिल सर्जन आणि पोलिस अधीक्षकांची चांगलीच गोची झाली. त्यांनी या पत्रकार परिषदेतून अक्षरश: काढता पाय घेतला. या बाबत पत्रकारानी सिव्हिल सर्जन यांना विचारणा केली असता या प्रात्याक्षिकाला कुठलाच शासकीय आधार नसल्याचे सांगितले.
दुसरीकडे हे प्रतिक्षिक दाखवणारे मात्र आपल्या मतावर ठाम आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना विचारले असता उत्तर देताना त्यांचीही चांगलीच अडचण झाली. दरम्यान, कोरोना व्हायरस पळण्यासाठी वैद्यकीय उपचार घ्यावे, का अशा प्रकारे गोवऱ्या जाळव्या असा प्रश्न उपस्थिताना पडला होता.
या संपूर्ण प्रकारणाबाबत मीडियात बातम्या सुरु झाल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांनी सावरासवर केली आहे. घरातील हवा कशी स्वच्छ ठेवावी, जंतू कश्यामुळे मरतात, याचे ते प्रात्यक्षिक होते,कोरोना आणि या धूप प्रात्यक्षिकाचा काही संबंध नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
राज्यात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने व्यापक उपाययोजना केल्या आहेत.कोरोना व्हायरसचा बिमोड करण्यासाठी आख्ख जग विज्ञानाचा आधार घेत उपाय शोधत असताना उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने मात्र एक गावठी उपाय शोधला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातच कोरोना व्हायरस पळवण्यासाठी चक्क शेणाच्या गोवऱ्या व धूप जाळण्यात आल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

From around the web