करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू

 
करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू
उस्मानाबाद  - राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.

    यानुसार करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक कार्यक्रमांसाठी पुढील आदेश होईपर्यंत परवानगी मागण्यात येऊ नयेत तसेच यापूर्वी दिलेल्या परवानगी रद्द समजाव्यात.

     त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व सर्व नगर पंचायत क्षेत्रातील अंगणवाड्या 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.
      याचबरोबर सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी शाळा तसेच महाविद्यालय व आयुक्त, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था दि.31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत.

      मात्र दहावी व बारावीच्या परीक्षा तसेच विश्वविद्यालयाच्या परीक्षा विहित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील.त्याचप्रमाणे आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही, यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचनाही संबंधित संस्थाप्रमुखास देण्यात आल्या आहेत,असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.

    या सर्व सूचना साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 मधील अधिसूचना व नियमावलीतील तरतुदीनुसार देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.

From around the web