5 G नंतर मीडियात होणार भूकंप !

 
5 G नंतर मीडियात होणार भूकंप !
येत्या दोन वर्षात संपूर्ण भारतात 5 G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यामुळे प्रिंट आणि टीव्ही मीडिया अधिक धोक्यात येईल तर डिजिटल मीडिया क्रमांक 1 वर येईल . पत्रकारांनी काळाची गरज ओळखून स्वतःला अपग्रेड करण्याची गरज आहे.

फाइव्ह-जीमुळं काय होणार ?

– निरंतर कव्हरेज, अधिक गती, व्हिडिओंची अधिक सुधारित गुणवत्ता, अधिक डेटा पाठवण्याची आणि मिळविण्याची संधी, अधिक विश्‍वसनीयता आणि संपर्काच्या विविध पैलूंमध्ये कमी विलंब अशा अनेक गोष्टी शक्य होतील.
– अभिनवतेला चालना मिळेल आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल घडू शकेल. फाइव्ह-जीमधला डेटा स्पीड तब्बल १० जीबीपीएसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज.
– ऑनलाईन उपलब्ध असलेला कंटेट किंवा आशय यामध्ये आमूलाग्र बदल.
– फाइव्ह-जी नेटवर्क इंटरनेट ऑफ थिंग्जसह ऑटोमोटिव्ह, आरोग्यसेवा, शेतीविषयक तंत्रज्ञान, शैक्षणिक सुविधा आणि उत्पादन या उद्योगांमधलं सर्वांत पसंतीचं तंत्रज्ञान म्हणून पुढं येईल.
– हँडसेट्सच्या बॅटरीचं आयुष्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं एवढा काळ टिकू शकेल
(संदर्भ – डॉ. मिलिंद पांडे यांचा सकाळमधील लेख )

प्रिंट आणि टीव्ही मीडियावर होणार परिणाम

प्रिंट आणि टीव्ही मीडियाला सध्या घरघर लागली आहे. 5 G सुरू झाल्यानंतर ही घरघर अधिक वाढेल . वृत्तपत्राची जागा ऑनलाइन न्यूज पोर्टल आणि ईपेपर घेतील तर टीव्हीची जागा युट्युब, HOTSTAR , JIO सारखे अँप घेतील.

> वृत्तपत्र काढण्यासाठी लागणारा खर्च आणि येणारे उन्पन्न याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यात कागदाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कमी झालेल्या पानाची संख्या त्याचेच द्योतक आहे. घरोघरी वृत्तपत्र वाटणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.त्यात स्मार्ट फोनचा वापर वाढल्याने वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सर्व वृत्तपत्रांचे खप घसरले आहेत. तसेच जाहिरातदार हा वृत्तपत्रात जाहिरात देण्याऐवजी ऑनलाइन जाहिरात करत असल्याने वृत्तपत्रांतील जाहिरातीचे प्रमाण कमी होत आहे.वृत्तपत्रांत जाहिरात देण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या १० टक्के खर्चात जाहिरात होत असेल तर जाहिरातदार ऑनलाइन जाहिरात करेल. परिणामी येत्या काही वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील.

> टीव्ही न्यूज चॅनल सुरु करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. विशेष म्हणजे त्याचे प्रक्षेपण करण्यासाठी एका DTH वर एक वर्षाला किमान एक कोटी खर्च लागतो. गावोगावचे केबल चालकही आता पैसे मागत आहेत. सर्व DTH आणि केबलवर प्रक्षेपण करण्यासाठी वर्षाला किमान १० कोटी खर्च लागतो. स्टुडिओ भाडे, कर्मचाऱ्यांच्या पगारी आणि अन्य खर्च वेगळा. त्यामुळे आहे ते चॅनल बंद पडतील आणि त्याची जागा युट्युब, HOTSTAR , JIO सारखे अँप घेतील.

5 G सुरु झाल्यानंतर वेबसाइट, अँप, युट्युब आणि सोशल मीडिया अधिक गतिमान आणि वेगवान होईल.लोकांना लाइव्ह दृश्ये म्हणजे व्हिडीओ पाहण्यात अधिक इंटरेस्ट आहे. 5 G मुळे व्हिडीओ अधिक गतिमान आणि HD पाहता येतील. स्मार्ट फोनवर व्हिडिओ कॉन्फरन्स HD दिसेल. तसेच फेसबुक लाइव्ह पण HD दिसेल. आपल्या गावात जर एखादा कार्यक्रम असेल तर लोक ते सोशल मीडियावर लाइव्ह करतील. व्हाट्स अँप वर व्हिडिओ HD दिसतील. लोक आपल्या गावातील व्हाट्स अँपग्रुप वर कोणताही कार्यक्रमाचा व्हिडीओ शेयर करत असतील तर उद्या छापणाऱ्या प्रिंट मिडीयातील बातम्या कश्याला वाचतील ? आपल्या गावाची बातमी टीव्हीवर येत नसेल तर टीव्ही लोक का म्हणून पाहतील ?

आजची बातमी उद्या कश्याला ? आजची बातमी आज नव्हे आताच यामुळे लोकांचा कल डिजिटल मीडियाकडे वाढत चालला आहे. भविष्यात तो अधिक वाढेल. त्यामुळेच साखळी वृत्तपत्रे सुद्धा डिजिटल मीडियावर लक्ष केंद्रित करत आहेत.

सुनील ढेपे
उस्मानाबाद – पुणे
9420477111

From around the web