
‘डर्टी पिक्चर’ , या हिंदी चित्रपटातली विद्या बालननं केलेली बिनधास्त भूमिका वेगळ्या अर्थानं गाजली. तिनं प्रचंड अंगप्रदर्शन करून सवंग लोकप्रियता मिळव-ल्याचे आरोपही समीक्षकांनी केले. या टिकेला तिनं काही उत्तरही दिलं नाही. पण याच चित्रपटातल्या भूमिकेबद्दल तिचा केंद्र सरकारनं, ‘सर्वोत्कृष्ठ’ अभिनेत्रीच्या राष्ट्रीय पुरस्कारानं अलिकडंच गौरवलं. या पुरस्कारामुळं तिच्यावर टीका करणाऱ्यांची तोंडं आपोआपच बंद झाली.
१ जानेवारी १९७८ रोजी जन्मलेल्या विद्याचं माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईत झालं. हिंदी चित्रपटात अभिनेत्री व्हायचं तिचं स्वप्न होतं. पण, प्रारंभी तिला हिंदी चित्रपटात भूमिका मिळाल्या नाहीत. बंगाली आणि मल्ल्याळी चित्रपटात तिनं काही भूमिका केल्या. चक्रम हा तिनं भूमिका केलेला पहिला मल्ल्याळी चित्रपट. चित्रपटसृष्टीत आपला जम बसत नाही, हे लक्षात येताच विद्यानं, जाहिरातीच्या क्षेत्रात पदार्पण केलं. विविध कंपन्यांच्या जाहिरातीत ती चमकली. २००३ मध्ये तिला ‘भालो तेखो’ या बंगाली चित्रपटात नायिकेची भूमिका मिळाली आणि याच भूमिकेबद्दल आनंदलोक सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री पुरस्कारानं तिचा गौरव झाला. २००५ मध्ये तिला हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला. परिणीता हा तिचा पहिला चित्रपट. या चित्रपटातली भूमिका तिनं अत्यंत समरसून साकारली. तिला लोकप्रियता मिळाली. ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटात तिनं रेडिओ जॉकी जान्हवीची भूमिका केली होती. हा चित्रपटही प्रचंड गाजला. आपल्याला नायिकेचीच आणि अमकीच भूमिका हवी, असा अट्टाहास तिनं कधीच धरला नाही. मिळेल ती भूमिका तिनं जीव ओतून साकारली. मणि रत्नमच्या ‘गुरु’ या चित्रपटातही तिनं छोटीशी भूमिका केली होती. एकलव्य या चित्रपटात संजय दत्त, अमिताभ बच्चन, सैफ अली खान यांच्या समवेत तिनं काम केलं. भुलभुलैय्या या चित्रपटातली तिची भूमिकाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती.
सर्वश्रेष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या आईची आव्हाना-त्मक भूमिका विद्यानं ‘पा’ या चित्रपटात केली. एका आजारानं वाढ खुंटल्यानं बारा वर्षे इतकंच वय राहिलेल्या त्या मुलाच्या आईची भूमिका करताना तिनं, त्या भूमिकेचा अभ्यासही केला होता. दोन वर्षांपूर्वी विशाल भारद्वाजच्या इश्किया या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेची चित्रपट समिक्षकांनी मुक्तपणे प्रशंसा केली. तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. डिसेंबर २०११ मध्ये एकता कपूरचा ‘डर्टी पिक्चर’ हा दक्षिणेतली अभिनेत्री सिल्क स्मिता हिच्या शोकांत जीवनावरच्या कथेचा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात विद्यानं केलेल्या कामुक, उत्तान दृश्यांची, नृत्यांची चर्चाही खूप झाली. लोकप्रियतेसाठीच तिनं अभिनय सोडून उत्तानतेचा आश्रय घेतल्याचे आरोपही झाले. पण याच चित्रपटातल्या अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार तिला मिळाल्यानं तिच्या अभिनय गुणावर शिक्कामोर्तब झालं आहे.
|