
उस्मानाबाद जिल्ह्यावर तब्बल ३० ते ३५ वर्षे डॉ.पद्मसिंह पाटील यांचे राजकीय वर्चस्व होते. या जिल्ह्यावर त्यांचा एकछत्री अंमल होता. ‘डॉ.पाटील बोले, दल हाले’ अशी परिस्थिती होती. या ३० - ३५ वर्षात अनेक विरोधक आले व गेले पण डॉ.पाटील यांचा बालही बाका झाला नव्हता. विरोधकांना ऐनवेळी चारी-मुंड्या चित करण्यात तरबेज असणारे डॉ.पाटील गेल्या चार-पाच वर्षात मात्र अडचणीत आले आहेत. ही अडचण त्यांचेच चुलत भाऊ पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर निर्माण झालेली आहे. या हत्येचा कलंक त्यांच्या माथ्यावर लागला नसता तर अजूनही डॉ.पाटील यांचेच पुर्णपणे वर्चस्व राहिले असते.
कै.पवन राजेनिंबाळकर यांचे पुत्र आ.ओमराजे निंबाळकर हेच आता त्यांचे राजकीय अडसर ठरले आहेत. मराठवाड्यातील पहिला साखर कारखाना म्हणून तेरणाची ओळख होती. या कारखान्यावर डॉ.पाटील यांचे ३५ वर्षे अधिराज्य होते. तो कारखाना साडेचार वर्षापासून ओमराजेंच्या ताब्यात आहे. पाठोपाठ जिल्हा परिषद गेली. आता उरलेली जिल्हा मध्यवर्ती बँकही गेली आहे. त्यामुळे डॉ.पाटील यांचे राजकीय आयुष्य एकंदरीतच अडचणीत आले होते. पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतील पराभव डॉ.पाटील यांच्या जिव्हारी अगोदरच लागलेला आहे. त्यात एका पाठोपाठ एक सत्तास्थाने चालल्यामुळे डॉ.पाटील कमालीचे चिंतेत होते. त्यामुळेच काही महिन्यापुर्वी झालेली उस्मानाबाद नगर परिषदेची निवडणूक तर ‘जिंका किंवा मरा’ याप्रमाणे ठरली होती.सुदैवाने न.प.वर डॉ.पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले. ऐवढेच नाही तर तुळजापूरच्या १९ च्या १९ जागा जिंकूण डॉ.पाटील व त्यांचे पुत्र आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी राजकारणातील आपले स्थान कायम असल्याचे दाखवून दिले.
आता पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द करण्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे.कारण काँग्रेसमध्ये आता राम राहिलेला नाही. तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण कॅबिनेट मंत्री व जिल्हयाचे पालकमंत्री होवूनही जिल्हयात काँग्रेस बळकट झाली नाही, उलट गटबाजीच्या राजकारणामुळे चांगलीच पोखरली आहे. विश्वास नसलेल्या माणसांवर नको ऐवढा विश्वास टाकल्यामुळे काँग्रेसचा दुसरा गट नाराज आहे. हा गट ‘मला नाही तर तुलाही नाही’ अश्या पध्दतीने काम करीत असल्यामुळे काँग्रेसचे उमेदवार न.प. निवडणुकीत पडले आहेत.त्याचीच पुर्नरावृत्ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. मुरूमचे रहिवासी व औसाचे आ.बसवराज पाटील उमरगा-लोहारा तालुका वगळता इतरत्र लक्ष द्यायला तयार नाहीत. मधुकररावांना तुळजापूर तालुका वगळता इतरत्र म्हणावे तसे स्थान नाही.उस्मानाबादमध्ये विश्वास शिंदेंची चलती आहे. कळंब, भूम, परंडा,वाशी तालुक्याला नेतृत्व नाही. त्याचा जबरदस्त फटका काँग्रेसला बसण्याची चिन्हे आहेत. या उलट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डॉ.पाटील व त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचेच वर्चस्व असल्यामुळे व निवडणुकीचा सर्व खर्च पेलण्याची ऐपत असल्यामुळे यंदाची निवडणूक अटीतटीची व चुरशीची ठरणार आहे.
मल्हारीकांत तुळजापूरकर
|