A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
झलक
 
 
दुष्काळात तेरावा महिना...
(Updated on 07/05/2013 0 : 24 IST)
 
दुष्काळात तेरावा महिना... उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. १९७२ च्या दुष्काळानंतर सर्वात बिकट परिस्थिती यंदा निर्माण झाली आहे.जिल्ह्यात मोठे प्रकल्प दोन, मध्यम प्रकल्प १७ आणि आणि लघु पाटबंधारे तलाव १९३ आहेत.काही बोटावर मोजण्याऐवढया लघु पाटबंधारे तलावात थोडे बहुत पाणी शिल्लक राहिले आहे.सर्वच्या सर्व मध्यम तसेच लघु पाटबंधारे तलाव आटले आहेत.उस्मानाबाद शहराला पाणी पुरवठा करणारे तेरणा मध्यम प्रकल्प गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदा कोरडे पडले आहे.
अडथळ्याची शर्यत पार करून उजनीचे पाणी उस्मानाबाद शहरात आले असले तरी, पंधरा दिवस झाले तरी शहराच्या अर्धा भागाला अजून पाणी मिळाले नाही.शहरात असलेली जुनी पाईपलाईन आणि नियोजनाचा अभाव यामुळे एकीकडे मुबलक पाणी तर दुसरीकडे पाण्याचा ठणठणाट अशी परिस्थिती आहे.नगर पालिकेचे मुख्याधिकारी गेल्या एक महिन्यापासून रजेवर आहेत.नगर पालिकेत नियोजन करणारा दुसरा अधिकारी नाही.शहरात पाण्याची ओरड असली तरी, लोक अजूनही शांत आहेत.उजनीचे पाणी आल्यापासून थोडा बहुत दिलासा मिळाला असला तरी,शहरातील सर्व भागात पाणी पुरवठा होण्यासाठी नियोजनाची गरज आहे.
शासन दुष्काळ निवारणासाठी करोडो रूपये खर्च करीत आहे.जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे हे आता आठवड्याला पत्रकार परिषद घेवून, वाढलेल्या खर्चाची माहिती देत आहे.दबंग फेम सलमान खानने सुध्दा उस्मानाबाद जिल्ह्याला ५०० पाण्याच्या टाक्या दिल्या आहेत.गावोगावी टाक्या आहेत,पण त्यात पाणी नाही,अशी परिस्थिती आहे.लोक २ ते ३ किलोमीटर अंतरावरून पाणी आणत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.मागणी आल्यानंतर टँकर देण्याची ग्वाही शासनाकडून देण्यात आली असली तरी, दिवसांपासून एक वेळ आलेला टँकर किती लोकांची तहान भागवणार,हा प्रश्नच आहे.
सर्वात मोठा प्रश्न जनावरांचा झाला आहे. बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकरांसारखे काही सामाजिक कार्यकर्ते पुढे सरवावले नसते तर दुध उत्पादकांना आपली जनावरे कसायाला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.हांडोग्री या छोट्याशा गावानजिक सुरू करण्यात आलेल्या या चारा छावणीत आजमितीस ७ हजार जनावरे आश्रयाला आली आहेत.जिल्ह्यात भूम तालुक्यात १८, कळंब तालुक्यात १०, उमरगा तालुक्यात २ आणि उमरगा तालुक्यात १ अशा ३१ छावण्या सुरू असून,त्यावर १८ हजार ६१४ जनावरे आपली तहान - भूक भागवित आहेत.जैन संघटनेने काही ठिकाणी शासनाचे एक रूपयाही अनुदान न घेत छावण्या सुरू केलेल्या आहेत.याबद्दल त्यांचे अभिनंदनच करावे लागेल.सत्तेवर असलेल्या आणि विरोधी पक्षात असलेल्या एकाही आजी - माजी आमदाराने आणि खासदाराने जनावरांसाठी छावणी सुरू केलेली नाही.केवळ बोलाचा भात आणि बोलाची कढी चालू आहे.
पदरमोड करून, चारा छावणी सुरू करायची आणि एक महिन्यानंतर केवळ एका जनावरांसाठी एक दिवसांसाठी साठ रूपये अनुदान घ्यायचे,हे कोणत्याही व्यवहारी माणसांला परवडणारे नाही.त्याला सामाजिक कर्तव्याचीच जाणीव लागते.हांडोग्री गावाजवळच्या माळरानावर बाळासाहेब पाटील यांनी सात किलो मीटर अंतरावरून ३५ लाख रूपये खर्च करून, चारा छावणीसाठी पाणी आणले, पंतर निवा-यांची आणि चा-यांची सोय करून, ७ हजार जनावरे जगवली आहेत, त्याला तोड नाही.चार जनावरे सांभाळताना एका माणसांचा जीव मेताकुटीस येतो, तेथे सात हजार जनावरे सांभाळणे, हे नॉट फॉर जोक आहे.बाळासाहेबांच्या या सामाजिक कार्यास शुभेच्छा द्यावा,तेवढ्या थोड्या आहेत.
पावसाळा सुरू होण्यास अजून दीड महिन्याचा अवकाश आहे.पिण्याचे पाणी,जनावरांना चारा आणि मजुरांना काम या तीन बाबीवर शासनाचा धडक कार्यक्रम सुरू आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्ह्यातील बहुतांश गावांना भेटी देवून, उपाययोजना करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.मात्र अधिका-यांची म्हणावी तशी साथ त्यांना भेटत नाही.अधिकारी होय...होय म्हणून वेळ निभावून नेत असल्याचे चित्र काही ठिकाणी पहावयास मिळत आहे.अशा कामचुकार अधिका-यांवर कडक कारवाई होण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी डॉ.के.एम.नागरगोजे यांचा महसूल खात्यावर कसलाही वचक नाही.ते स्वत: रात्री उशिरापर्यंत मेहनत घेत असले तरी,त्यांच्या हाताखालील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत नाहीत.त्यामुळे बरीच कामे वेळेवर होत नाहीत.तुळजापूर तिर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामेही आता संथ गतीने चालू आहेत.डॉ.गेडाम असते तर तुळजापूरची सर्व कामे मागेच पार पडली असती,पण थंड आणि वचक नसलेला जिल्हाधिकारी उस्मानाबादला लाभल्यामुळे दुष्काळात तेरावा महिना महिन्याची पाळी आली आहे.

- सुनील ढेपे
 
 
  संबंधित बातम्या
दुष्काळात तेरावा महिना...  
कोणता 'दादा' चांगला?  
बा इठ्ठला, यांना माफ कर...  
वृध्दावस्था, शाप की वरदान?  
निवडणुकीतच कळणार नेत्यांचे 'पाणी'...  
महिला सबलीकरणाच्या दिशेने एक पाऊल पुढे...  
पाणीदार प्रशासक !  
उपोषण सुटले, टेन्शन मिटले...  
राजकारण तापले, पण मतदार जागे होतील का?  
ओमराजेंचे 'टायमिंग' चुकले...  
महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून साधली उन्नती  
अजून तर अश्रूही सुकले नाहीत ...  
कोबायशी - एक शिक्षक आणि बालस्नेही शिक्षण  
उस्मानाबादच्या मातीतील कलाकार  
निवडणूक सुधारणा- काही सुचना  
 
   
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :