A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
सप्तरंग
 
 
अमेरिकेचा मस्तवालपणा
(Updated on 17/04/2012 11 : 0 IST)
 
अमेरिकेचा मस्तवालपणा अमेरिकेतल्या येल विद्या-पीठात व्याख्यानासाठी जाणारे अभिनेता शाहरुख खानला न्यूयॉर्कच्या विमानतळावर दोन तास अडकवून ठेवायची घटना ही अमेरिकेच्या मस्तवालपणाचे जळजळीत उदाहरण होय. यापूर्वीही शाहरुख खानला अमेरिकन विमान-तळावर असेच अडवून ठेवण्यात आले होते. केंद्र सरकारने त्या घटनेचा निषेध केल्यावर अमेरिकन परराष्ट्र खात्याने दिलगिरी व्यक्त करून त्यावर पडदा टाकला होता. आता दुसऱ्यांदा त्याचाच अपमान अमेरिकन विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून केला. अमेरिकेला शाहरूख काही पर्यटक म्हणून किंवा कुणाला भेटायसाठी गेलेला नव्हता. येल विद्यापीठाने व्याख्यानासाठी त्याला आमंत्रित केले होते. नीता अंबानी यांच्या समवेत तो विशेष विमानाने न्यूयॉर्कच्या विमानतळावर पोहोचला, तेव्हा फक्त त्याला एकट्यालाच अधिकाऱ्यांनी अडवले. त्याची दोन तास कसून तपासणी केली. व्याख्यानाला जायसाठी त्याला तब्बल दोन तास उशीरही झाला. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी तातडीने अमेरिकन परराष्ट्र खात्याला या घटनेबद्दल धारेवर धरताच, या अधिकाऱ्यांनी माफी मागितली. पण पाहुण्याचा, त्याला डांबून ठेवून अपमान करायची ही घटना फक्त माफी मागून संपण्यासारखी नसल्याचे कृष्णा यांनी बजावले, ते योग्य झाले.
न्यूयॉर्कमधल्या विश्व व्यापार केंद्रावर अल्‌ कायदाच्या दहशत-वाद्यांनी हल्ला चढवल्याच्या घटनेनंतर अमेरिकेने देशांतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली. परदेशातून येणारी प्रत्येक व्यक्ती दहशतवादी असल्याच्या संशयाने अमेरिकन सुरक्षा यंत्रणेला पछाडले असल्यानेच, जगातल्या अति महत्वाच्या व्यक्तींना, राष्ट्रीय नेत्यांचाही अपमान केल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनाही अशीच अपमानास्पद वागणूक विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस, भारताच्या माजी राजदूत मीरा शंकर, माजी नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांचाही अपमान विमानतळावरच्या अधिकाऱ्यांनी केलेला होता. संयुक्त राष्ट्रसंघातले भारतीय राजदूत हरदीप सिंह पुरी यांचीही ह्यूस्टन विमानतळावर अशीच कसून चौकशी केली होती. डॉ. कलाम यांची गेल्या वर्षीही न्यूयॉर्क विमानतळावर चौकशी करताना अधिकाऱ्यांनी सारे राजशिष्टाचार गुंडाळून ठेवले होते. त्यांना त्यांचे बूट आणि कोटही उतरण्यास तपासणी अधिकाऱ्यांनी भाग पाडले होते. अमेरिकन प्रशासन आणि विमानतळ तपासणी अधिकाऱ्यांचा हा माज उतरवल्याशिवाय, भारतीयांचा अपमान करायच्या निंद्य घटना थांबणार नाहीत. अमेरिकन मंत्री आणि अधिकाऱ्यांनाही भारतीय विमानतळावर असेच पाच/सहा तास डांबून ठेवून चौकशीचे नाटक केल्याशिवाय, अमेरिकन प्रशासनाला चोख प्रत्युत्तर मिळणार नाही. या पुढच्या काळात अशी घटना घडल्यास अमेरिकेतून येणाऱ्या एकाही व्यक्तीस कसून झडती घेतल्याशिवाय विमानतळावरून बाहेर सोडले जाणार नाही, असे कडक धोरण केंद्र सरकारने स्वीकारायला हवे. अमेरिकेचा माज उतरवायचा हाच त्यांना समजेल असा मार्ग आहे.
 
 
  संबंधित बातम्या
कृष्णा-भीमा स्थिरीकरण : वास्तव की स्वप्न  
उजनीचे पाणी आले, पण...  
दुष्काळाची चाळीशी...  
जि.प.व न.प.च्‍या शाळांचे भवितव्‍य काय?  
सर्जकांचे पंख कापू नका  
मिश्र विवाहांना आले दिवस किती चांगले!  
काकांचा गळ आणि ’ सर्पमित्र’ दादांची मासेमारी!  
आष्टीचे धस(कट)  
कोत्तापल्लेंनी घेतला ‘त्यांचा’ समारोपात समाचार...!  
व्यसनमुक्त तरुण-उद्याचे भविष्य  
‘रंगयात्री’ च्या निमित्ताने...  
गुंड आणि पुचाट  
अंबाजोगाई साहित्य संमेलन अध्यक्षांचे भाषण  
शिक्षणाची गाडी चालली...  
पुढा-यांच्या घरात पुढारीच का जन्मतात?  
 
   
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :