A Leading E-Newspaper from Osmanabad....
     
 
 
सप्तरंग
 
 
माध्यमांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभं करण्याची कवायत
(Updated on 07/04/2012 8 : 58 IST)
 
लष्कर प्रमुख जनरल व्हि.के.सिंग यांनी पंतप्रधानांना लिहिलेलं गोपनीय पत्र प्रसिध्द करून आणि लष्कराच्या दोन तुकड्या दिल्लीच्या दिशेनं निघाल्या होत्या ही बातमी इंडियन एक्स्प्रसनं बुधवारच्या अंकात छापून माध्यमांना मोठा गुन्हा केलाय असं चित्र निर्माण करीत त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची कवायत सध्या सुरू आहे.लष्कराच्या संबंधित अशा बातम्या देणं हा देशद्रोह आहे असं म्हणण्यापर्यत काही बोलभांड राजकारण्याची मजल गेली आहे.लष्करात सध्या जे घडतंय ते माध्यमांमुळंच असा आभास निर्माण करीत काही प्रवृत्ती या बातम्यांचं निमित्त करून माध्यमांनाच झोडपून काढण्याचा खटोटोप करीत आहेत.यातला विरोधाभास असा की ज्या बातम्या आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत असं सरकारही म्हणत नाही. ‘व्हि.के.सिंग यांनी पंतप्रधांना पत्रच लिहिलेलं नाही, जे छापून आलंय ते कपोलकल्पीत पत्र आहे ’ असं आजवर तरी कोणी म्हटलेलं नाही.इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीचंही कोणी खंडन केलेलं नाही.‘दोन तुकड्या दिल्लीकडं कूच करू लागल्या होत्या हे साफ खोटं आहे’ असंही कोणी म्हटलेलं नाही.बातम्यांच्या सत्यत्येबद्दल कोणाला शंका नाही.आक्षेप आहे तो बातम्या सत्य असल्या तरी त्या का छापल्या याला.!या बातम्यांमुळं देशाच्या सुरक्षिततेलाच धोका निर्माण झाला आणि त्यामुळं देशात घबराटही निर्माण झाली असं माध्यमांवर आक्षेप घेणारांचं म्हणणं आहे.हे मत दिशाभूल करणारं आणि माध्यमांबद्दलच्या आकसापोटी व्यक्त झालेलं आहे.या व्यक्तव्यामागं माध्यमांवर बंधन आणण्याचा छुपा हेतूही ध्वनित होताना दिसतो.असं नसतं तर पत्र कसं आणि कोणी फोडलं यावर चर्चा करण्यापेक्षा ते छापलं कसं गेलं यावर चर्चा झाली नसती.लष्कर प्रमुख भारतीय लष्करातील काही उणिवांबद्दल काही मतं पंतप्रधानांना पत्राव्दारे कळवितात आणि ते पत्र सहजपणे माध्यमांच्या हाती लागतं यावरून आमच्या लष्करातील सारी यंत्रणा किती पोखरली गेलीय हे स्पष्ट होत नाही काय? ज्या पत्रावर ‘टॉप सिक्रेट’ असं लिहिलेलं आहे असं पत्रही जर गुप्त राहात नसेल तर मला वाटतं यापेक्षा धोकादायक स्थिती दुसरी कोणती नसेल.एका पत्रकाराला हे गोपनीय पत्र सहज मिळत असेल तर परदेशी गुप्तचरांना भारतीय लष्करातील गुपितंही सहज मिळविता येऊ शकतात असा याचा अर्थ कोणी घेतला तर त्याला दोष देता येणार नाही.आता असं सांगितलं जातंय की,सिंह यांना अडचणीत आणण्यासाठीच हे सारं कारस्थान रचलं गेलं आहे. घटकाभर हे खरंही असंल तरी हे कारस्थान रचणारे कोण आहेत हे लष्कराला आठ दिवस उलटून गेल्यानंतरही जर शोधता येत ऩसेल तर ही गोष्टही चिंता वाढविणारी आहे. ’ ज्यांनी पत्र माध्यमाना दिलंय त्याला आम्ही जनतेपुढं उघडं करू’ असं अजूनही सरकार म्हणत नाही .उलट डीएनएचे साईकांत दत्ता यांची कृती देशद्रोहाची असल्याचं सांगत त्यांच्यावर ‘ऑफिशियल सिक्रे ट ऍक्ट’ खाली गुन्हा दाखल करावा असा सूर व्यक्त होताना दिसतो आहे.हा प्रकार माध्यमांच्या नरडीला नख लावणारा आणि भविष्यात अशी बातमी कोणी देऊ नये यासाठी पत्रकारांच्या मनात दहशत निर्मा़ण करणारा आहे. देशातील माध्यमं सर्वशक्तीसह अशा कोणत्याही प्रयत्नांना विरोध करतील हे वेगळं सांगण्याचं कारण नाही.ज्यांनी पत्र फोडलं त्याच्याबद्दल कोणीच काही बोलत नाही ज्यांनी पत्र छापलंय त्याच्याबद्दलच काहूर माजविलं जात आहे.हे काहूर माजविणारे असंही सांगतात की,पत्र वृत्तपत्रात आल्यानं आमच्या लष्करातील उणिवा शत्रूंना कळल्या आहेत.हे विधान जेवढं हास्यास्पद आहे तेवढंच पोरकटपणाचं आहे.कारण पंतप्रधानांचं पत्र प्रसिध्द झालं नसतं तर आमच्या लष्करातील उणिवा शत्रूनां समजणार नाहीत किंवा समजल्या नसतील अशी स्थिती नाही.वर्तमानपत्रात बातमी येऊ द्या मग भारतीय लष्करातील उणिवा आपणास आपोआप समजतील असं म्हणत विरोधी राष्ट्रे गप्प बसत नाहीत.शत्रू राष्ट्रांची गुप्तचर यंत्रणा गुपितं फोडण्याचं काम सातत्यानं करीत असते. म्हणूनच दत्ता यांनी हे पत्र छापलं म्हणूनच शत्रूंना माहिती कळली असं म्हणणं हे माध्यमांबद्दल जनतेच्या मनात संशय निर्माण करणारं आहे.उलट या बातमीमुळं जगातील सहाव्या क्रमांकाची लष्करी ताकद म्हणत आपण जी स्वतःची पाठ थोपटून घेत असतो ती किती चुकीची आहे आणि लष्करात सुधारणेला किती वाव आहे हे देशातील आम जनतेला समजलं आहे.ते समजणं आवश्यकही आहे असं मला वाटतं.गंमत अशी की,ज्या गोष्टी लष्कर प्रमुखांनी पत्रात लिहिल्या आहेत त्यावर कोणी बोलत नाही.लष्कर प्रमुखांनी आपणास लाच देण्याचा प्रयत्न झाला हे स्पष्ट केल्यानंतरही तो लाच देणारा कोण होता? हे सरकार अधिकृतपणे जाहीर करीत नाही.त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हाही दाखल करीत नाही.सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारताच्या लष्कर प्रमुखास १४ कोटींची लाच देऊ करण्याची कोणी हिंमतच कशी काय करू शकतो.?जी व्यवस्था थेठ लष्कर प्रमुखांनाच विकत घेण्याची तयारी करू शकते ती व्यवस्था खालच्या पातळीवरील अधिकाऱ्यांकडून काय काय कामं करून घेऊ शकते याचा विचार केलेलाच बरा.हा सारा देशद्रोह नाही काय? लाच किंवा भ्रष्टाचाराची प्रकरणु लष्करात पहिल्यांदाच उघडकीस आलंय असंही नाही.देशाला स्वातंत्र्य निळाल्यापासून लष्करातील भ्रष्टाचार आणि लाचखोरीची अनेक प्रकरणं बाहेर आलेली आहेत.जीप घोटाळा असो,बोफोर्स कांड असो,की शवपेटीच्या खरेदीतील भ्रष्टाचार असो किंवा गरम कपडे आणि बूट खऱेदीतील भ्रष्टाचार असो अशी अनेक प्रकरण ं आपणास माहित आहेत. लष्कराचं वार्षिक बजेट बघता ज्ञात नसलेली भ्रष्टाचाराची किती प्रकरणं असू शकतात याचा अंदाज आपणास करता येऊ शकतो.सामांन्य सैनिकांचा या साऱ्या व्यवहाराशी काही संबंध नसतो.ते रात्रं -दिवस सिमेवर जीव धोक्यात घालून लढत असतात.ईक़डे सत्तेतील दलाल हा सारा मलिदा लाटत असतात.बातमी दिल्यानं देशद्रोह झाला म्हणणारे या साऱ्या घटनांना देशद्रोह समजत नाहीत काय? की यावरही वृत्तपत्रांनी काहीच बोलायचं नाही.? ही सारी प्रकरणं देशद्रोहाची असतील तर सरकारनं त्यावर काय कारवाई केली किंवा काय कारवाई केली जाणार आहे हे जनतेला समजलं पाहिजे. एकीकडं लष्करात भ्रष्टाचारांनं कळस गाठला असेल आणि दुसरीकडं ल़ष्कराच्या तुक़ड्या दिल्लीकडं कूच करीत असतील तरीही माध्यमांनी गप्प बसायचे काय?त्याच्या बातम्या द्यायच्या नाहीत काय?हे होणार नाही.देशाची काळजी केवळ राजकारण्यांनाच आहे असं नाही.आपली जबाबदारी माघ्यमांनाही कळते. अनेक आणीबाणीच्या प्रसंगी माध्यमांनी आपली परिपक्वता आणि देशप्रेम दाखवून दिलेलं आहे.त्यामुळं माध्यमांना कोणी सल्ले देण्याची गरज नाही.लष्कर प्रमुख ज्या दिवशी सर्वोच्य न्यायालयात जाणार होते त्याच दिवशी जर लष्कराच्या दोन तुकड्या दिल्लीच्या दिशेनं निघाल्या असतील आणि ही गोष्ट सरकारही नाकारत नसेल तर ही घटना प्रकाशात आणून इंडियन एक्स्प्रसेने देशहिताचंच काम केलं आहे असं मला वाटतं.लष्करी तुकड्याच्या हालचालीसाठी सरकारच्या परवानगीची गरज नसते असं लष्करामार्फत सांगितलं जातंय.नसेलही पण लष्कर प्रमुख ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालायता जाणार होते त्याच दिवशी या तुकड्यांनी दिल्लीकडं कूच करण्याचं काय कारण असू शकतं याचं उत्तर कोणी देत नाही.इंडियन एक्स्प्रसमधील बातमी ज्यांनी वाचली आहे त्याच्या हे लक्षात येईल की,या बातमीत लष्कराचा उठावाचा उद्देश होता असं कोठेही म्हटलेलं नाही.केवळ लष्कराच्या तुकड्यांनी कूच केली होती असा त्यात उल्लेख आहे.ही घटना असेल आणि ती सत्य असेल तर ती लोकांपर्यत पोहचविणं हे पत्रकारांचं कामच आहे.लष्कर आणि सरकार यांच्यात बेबनाव कसा सुरू आहे हे दर्शविणारी ही बातमी आहे.देशातील दुबळ्या सरकारचा गैरफायदा कसा घेण्याचा प्रयत्न होतोय आणि सरकारनं आणि देशातील जनतेनं याबाबत अधिक सावध असावं असा संदेश देणारी ही बातमी देशद्रोही कशी असू शकते ?राजकारणी सोडले तर आम भारतीयांनाही यात देशद्रोह दिसत नाही.सरकारला शेखर गुप्तांची ही बातमी जर खरोखरच देशद्रोहाची कृती वाटत असेल तर इंडियन एक्स्प्रेसवर सरकार देशद्रोहाचा खटला का भरत नाही?.सरकारला माध्यम स्वांतंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची फार चाड आहे म्हणून सरकार गप्प नाही तर हे प्रकरण जर न्यायाल्यात गेलं तर अनेक भानगडी बाहेर येतील आणि सरकारची आणखी फठफिजीती होईल अशी भिती सरकारला वाटते म्हणूनच माध्यमांची जेवढी बदनामी करता येईल तेवढी करीत सरकार गप्प आहे.खरं म्हणजे सरकार आणि लष्कर यांच्यात गेल्या सहा महिन्यापासून जी धूसपूस सुरू आहे ती कोणत्याही बातमी पेक्षा जास्त चिंतांजनक आहे.लष्कर प्रमुखाच्या वयाचा विषय थेट सर्वैच्च न्यायालायत जावा ही गोष्ट सरकारसाठी शरमेची आणि लष्करप्रमु़ख पदाची गरिमाच संपुष्टात आणणारी आहे. तरीही सरकारनं ते खपवून घेतलं.त्यानंतर लष्कर प्रमुखांनी निवृत्तीच्या काही दिवस अगोदर पंतप्रधांनाना पत्र लिहून काही गोष्टींची चर्चा करणं,लष्कर प्रमुखांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाबाबत मत व्यक्त करणं ,आपणास लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करणं या साऱ्या गोष्टींची गंभीर दखल घेत सरकारनं कठोर पावलं उचलायला हवी होती.सरकारन आतापर्यत काहीच केलेलं नाही.का गप्प आहे सरकार?कोणाला आणि कशाला घाबरतंय सरकार ? लष्कर प्रमु़ख आपणास लाच देऊ केल्याच्या प्रकराणाची चर्चा आजच का करताहेत,संरक्षण प्रमुख ए.के.ऍन्टनी म्हणतात,लष्कर प्रमुख जे सांगतात ते सत्य आहे.लाच देऊ केल्याचं प्रकरण सत्य असेल तर त्यावर कारवाई न करणं हा देशद्रोह नाही काय ? लाच देऊ करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करू नका असं लष्कर प्रमुखांनी सांगणं आणि संरक्षण मंत्र्यांनं गप्प बसणं याला काय़ म्हणायचं.थेट लष्कर प्रमुखांना लाच देऊ केल्याच्या बातमीमुळं लष्कराची जी अप्रतिष्ठा झाली आहे ती भरून काढण्यासाठी सरकारनं काही पाऊलं उचलण्या ऐवजी वृत्तपत्रांच्या नावानंच कोल्हेकुई करणं कितपत समर्थनिय आहे. लष्करासारख्या संवेदनशिल विषयात अनेक चिंताजनक घडामोडी घडत आहेत.सरकारनं गुढ मौन धारण केलेलं आहे. हे सारं घडत असतानाही वृत्तपत्रांनी सरकारच्या भूमिकेला पूरक भूमिका घेत गप्प बसावं अशी जर कोणाची अपेक्षा असेल तर ते माध्यमांना शक्य नाही.भारतातील माध्यमांचा इतिहास बघितला तर इथल्या माध्यमांनी नेहमीच जनहित आणि देशहित सर्वैच्च मानलं आहे.त्यामुळं माध्यमांच्या नियतीबद्दलच संशय घेऊन सरकार आपल्या अपय़शावर पांघरून घालू शकत नाही.अलिकडं भांडवलदारी वृत्तपत्रं असा उल्लेख करून माध्यमातही फूट पाडण्याचा किंवा भांडवलदारी वृत्तपत्रे केवळ स्वहितासाठी अशा बातम्या देत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रय़त्न हेतूतः होतोय.लष्कर प्रमुखांनी पाठविलेलं पत्र छापणं असो किंवा लष्करी तुकड्या दिल्लीकडं कूच करीत निघाल्या होत्या असं म्हणणं यात भांडवलदारी वृत्तपत्रांचा कोणता स्वार्थ असू शकतो?.सरकार अस्थिर करण्याचा उद्देश असेल असं म्हणावं तर सरकार स्थिर आहेच कुठे ते अगोदरच अस्थिर आणि कमकुवत आहे. काही हेतू असेलच तर सध्याच्या सरकारच्या हातात देश किती असुरक्षित आहे हे देशातील जनतेला दाखवून देण्याचा शेखर गुप्ता यांचा उद्देश असू शकतो. तसा तो असेल तर तो देशहिताचाच आहे यात शंका नाही.लष्कराला आपण पवित्र गायीच्या ठिकाणी नेऊन बसविले आहे.त्यामुळं लष्कराबद्दल काही बोलणं किंवा लिहिणं हे महान पातक असल्याची आपली मानसिकता झालेली आहे.देशासाठी सर्वस्वाचं बलिदान देणाऱ्या लष्कराचा अभिमान प्रत्येकालाच आहे.माध्यमांनाही आहे. मात्र माध्यमांना भावनिक होऊन काम करता येत नाही. त्यामुळं जे चूक आहे ते चूक असल्याचं सांगणं वृत्तपत्रांचं काम आहे. लष्करात काही चुकीचं सुरू असेल तर ते जनतेला आवडणार नाही म्हणून माध्यमांना गप्प बसता येणार नाही.लष्करी अधिकाऱ्यांची पापं उघडी पाडण्याचं कामही माध्यमांना करावंच लागेल. हे करताना माध्यमांचा हेतू नक्कीच चांगला असतो.असावा.आपलं मुल चुकीचं वागलं तर आपण त्याचं थोबाड फोडतो.त्यामागं मुलानं भविष्यात तरी चांगलं वागावं अशी अपेक्षा असते.मला वाटतं ज्या बातम्या माध्यमांनी दिल्या आहेत त्या लष्कराला ना उमेद करण्यासाठी किंवा देशातील जनतेला भिती दाखविण्यासाठी दिलेल्या नाहीत तर लष्कराने भविष्यात तरी चुकांची पुनरावृत्ती करू नये किंवा चुकीचे पायंडे पाडू नयेत यासाठीच दिलेल्या आहेत.देशहित डो़ळ्यासमोर ठेऊनच माध्यमांनी हे काम केलेलं असल्यानं ते नक्कीच समर्थनीय आहे.शेखर गुप्ता याच्या जागी अन्य कोणताही संपादक असता तर त्यांनं हीच भूमिका घेतली असती.या बातम्यांमुळं राजकारण्यांची निष्क्रि यता सिध्द झाल्यानं त्यांचा थयथयाट सुरू आहे.त्यांच्या मतलबी आकांडतांडवाची तमा बाळगण्याचं माध्यमांना कारण नाही.

एस.एम.देशमुख
 
 
  संबंधित बातम्या
उजनीचे पाणी आले, पण...  
दुष्काळाची चाळीशी...  
जि.प.व न.प.च्‍या शाळांचे भवितव्‍य काय?  
सर्जकांचे पंख कापू नका  
मिश्र विवाहांना आले दिवस किती चांगले!  
काकांचा गळ आणि ’ सर्पमित्र’ दादांची मासेमारी!  
आष्टीचे धस(कट)  
कोत्तापल्लेंनी घेतला ‘त्यांचा’ समारोपात समाचार...!  
व्यसनमुक्त तरुण-उद्याचे भविष्य  
‘रंगयात्री’ च्या निमित्ताने...  
गुंड आणि पुचाट  
अंबाजोगाई साहित्य संमेलन अध्यक्षांचे भाषण  
शिक्षणाची गाडी चालली...  
पुढा-यांच्या घरात पुढारीच का जन्मतात?  
एफ.डी.आय. आहे तरी काय?  
 
   
A Leading E-Newspaper from Osmanabad....
सर्व हक्क सुरक्षित. कॉपीराईट 2010. Powerd by :