
बुधवारी पुण्याच्या रस्त्यावर मृत्यूनं जे तांडव केलं त्या धक्क्यातून पुणेकर आज दुसऱ्या दिवशीही सावरले नाहीत.‘मृत्यूच्या बसनं’ ज्या आठ निष्पाप लोकांना कायमचं आपल्यातून हिरावून नेलं त्यांचा काय गुन्हा होता या प्रश्नाचं उत्तर त्यांच्या नातेवाईकांना मिळालेलं नाही.मिळण्याची शक्यता नाही.कोणी शाळेत निघालं होतं,कोणी कॉलेजला जात होतं,कोणी रोजगारासाठी घराबाहेर पडलं होतं.काय होतंय याचा अंदाज येण्यापूर्वीच संतोष मानेच्या बसनं त्यांना चिरडून टाकलं.आठ जणांना प्राण गमवावे लागले.२७ जण जखमी झाले.नेहमी प्रमाणं हे का झालं ?याला कोण जबाबदार आहे ?याची चर्चा आता सुरू झाली आहे.संतोष माने मनोरूग्ण होता की नाही यावरही चर्वितचर्वण सुरू आहे.घटना घडून गेल्यानंतर त्यांच्या कारणांचा शोध घेणं मी समजू शकतो पण अशा घटनांमधून काही बोध घ्यायचा असतो आणि भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यायची असते याची जाणीव कोणी ठेवत नाही.उलटपक्षी जी घटना घडली त्याला आपण किंवा आपली संस्था कशी जबाबदार नाही हे दाखविण्याचाच प्रयत्न होतो.कालच्या घटनेच्या बाबतीतही हेच सुरू आहे.संतोष माने हा मानसिकरूग्ण होता की,नाही यावरच सध्या डोकेफोड सुरू आहे.एस.टी.महामंडळ सांगतंय तो मानसिक रूग्ण नव्हता .ईतर यंत्रणा त्याला मनोरूग्ण ठरवित आहेत.हे सारं आपआपल्या सोयी नुसार सुरू आहे.तो मनोरूग्ण होता असं म्हटलं तर मग एसटीनं त्याच्यावर वेळीच कारवाई का केली नाही किंवा त्याला सेवेत का ठेवलं हा प्रश्न विचारला जाईल म्हणून एसटी महामंडळ त्याला मानसिकदृष्ट्या फिट ठरवित आहे.पोलिस आणि ईतर यंत्रणांना तो मनोरूग्ण होता असं म्हटलं की,आपल्या जबाबदारीतून मुक्त होता येतं.वेडाच्या भरात त्यांनं हे कृत्य केलं असं म्हणत पोलिस झालेल्या प्रकारातून आपला बचाव करू शकताता किंवा जबाबदारीतून मुक्त होऊ शकतात.तो मनोरूग्ण आहे असं म्हटल्यावर या घटनेची अन्य अंगानं खोलात जावून चौकशी करण्याची गरजही पोलिसांना उरत नाही.सरकारसाठीही हे सोयीचं आहे कारण संतोषला वेड्यात काढलं की सरकारची जबाबदारी कमी होते.‘वेडाय्या भरात एखाद्यानं काही केलं तर त्याला काय करणार’ असं उध्या सरकार सांगू शकतं.ही सारी चर्चा आपली सोय आणि गैरसोय पाहून चालू आहे.तो मनोरूग्ण होता की,नाही हे एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाला तपासून ठरवू ध्या असं कोणाला वाटत नाही हा या चर्चेतला संतापजनक प्रकार आहे.स्वतःची कातडी वाचविण्यासाठी अशी चर्चा करणारे हे विसरतात की,संतोष मनोरूग्ण होता किंवा आहे असं म्हटलं गेलं आणि ते सिध्द झालं तर त्याला त्याचा न्यायालयात फायदा होईल याची पर्वा कोणीच करीत नाही हे या प्रकारातील एक संतापजनक सत्य आहे.संतोषच्या घरच्यांनीही आता तो मनोरूग्ण होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते असं सांगायला सुरूवात केली आहे.त्यांनं राजीनामा देऊ केला होता असं त्याचे घरवाले म्हणतात. एस.टी.महामंडळ ते नाकारते आहे.म्हणजे मुख्य मुद्दा बाजुला ठेऊन तो मानसिकरूग्ण आहे की नाही या भोवतीच चर्चा फिरवत ठेऊन पुणेकरांना शांत करण्याचा प्रयत्न होतो आहे. घटनाक्रम बघता तो मनोरूग्ण असेल अशी शक्यता नाही.घटना घडली त्याच्या आदल्या दिवशी तो गाणगापूर-पुणे बस व्यवस्थित घेऊन आला होता.पुणे-सातारा गाडी त्यानं बाहेर काढल्यानंतर आणि अनेकांना मृत्यूच्या दाढेत ढकलल्यानंतर त्याला जेव्हा जमावानं पकडलंलं आणि मारहाण केली तेव्हा जीवाच्या भितीनं तो पळत सुटला हे उपलब्ध क्लिपमध्ये दिसत आहे.तो मनोरूग्ण असेल तर त्याला स्वतःच्या जीवाची काळजी कशी वाटत होती हे कळायला मार्ग नाही.तज्ज्ञ डॉक्टराकडून त्याची योग्य ती तपासणी होण्यापूर्वीच यंत्रणांनी त्याला मनोरूग्ण अथवा माथेफिरू ठरविल्यामुळं त्यानंही ‘मी काय केलं ते मला कळलं नाही’ असं सांगायला सुरूवात केली आहे.संतोष किंवा कोण काय म्हणतंय यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे याचा सखोल शोध घेतला पाहिजे.चौकशी अंती काय सत्य बाहेर येईल ते येईल आज तरी एस.टी महामंडळच आठ ऩिष्राप लोकांचे मारेकरी असल्यांचं दिसतंय.संतोपनं स्वतःची गाडी नसताना सातारा गाडी बाहेर काढली.त्याबद्दल त्याला कोणीच विचारणा केली नाही.बहुतेक बसेसला चावी नसते.एक बटन दाबून कोणीही गाडी सुरू करू शकते .गाडी पळवू शकतो.हे संतोष मानेला माहित असल्यानं त्यानं त्याचा फायदा घेतला.गाडी पळविली.गाडी पळविल्यानंतर आरडाओरड झाली .ती स्वारगेट समोरच असलेल्या पोलिसांना ऐकू न येणं किंवा त्यांनी त्याकडं दुर्ल्रक्ष करणं स्वाभाविक आहे.कारण त्यांना ‘अन्य महत्वाची ’ कामं भरपूर असतात.त्यामुळं संतोष गाडी घेउन २५ किलोमीटरची सफर मारू शकला.अखेर पुना कॉलेजच्या एका धाडसी तरूणानं त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं.दोन पोलिसही नंतर गाडीच्या मागं धावत होते.त्यांनी टायरवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला पण त्यांची एकही गोळी टायरला लागली नाही.यावरून आमच्या पोलिस दलात किती तरबेज निशानेबाज आहेत याची कल्पना यावी.नेहमीप्रमाणे लोकांनी संतोषला पकडल्यावर मागावून पोलीस आले.त्यांनी संतोषला गाडीत घातलं आणि ते त्याला घेऊन गेले.हा झाला व्यवस्थेतला गोंधळ.लोकप्रतिनिधींना काय केलं? लोकांना शांत राहण्याचं फक्त आ़वाहन केलं.रूग्णालयात जावून नातेवाईकांच्या भेटीचे सोपस्कार केले.मावळच्या गोळीबारात जे तिकडं फिरकले नव्हते ते निवडणुकांचा सिझन असल्यानं तातडीनं ससूनमध्ये डेरेदाखल झाले.मृतांच्या नातेवाईकांना एक लाखाची मदत देण्याची घोषणा केली गेली.मात्र अशी घटना पुन्हा होणारच नाही याची हमी कोणीच दिली नाही.एसटी महामंडळात चालकाच्या मानसिक तपासण्या करण्याची कोणतीच सोय नाही हे या निमित्तानं समोर आलं.कित्येक प्रवाशांचे प्राण ज्याच्या हाती असतात त्या चालकाची मानसिकता कशी आहे हे कोणीच तपासत नाही.गाडी चालविताना कामाचा ताण,कौटुंबिक प्रश्नांचे ओझे,कार्यालयातील कटकटी असे अनेक प्रश्नांचे भोवरे त्याच्या डोक्यात फिरत असतात.यातूनच एखाद्या गाफिल क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता असते.तसे ते होतातही .महामंडळ याची पर्वा करीत असते असं दिसत नाही.़अनेक पातळ्यावरच्या निष्काळजीपणाच महामंडळाच्या कारभारात दिसतो.कारभार अवाढव्य आहे असं म्हटलं तरी लोकांचे प्राण त्यांच्या हातात आहेत म्हटल्यावर त्याची किमान काळजी अनिवार्य ठरते.पुण्याच्या ‘हादस्या’ नंतर तरी महामंडळाचे डोळे उघडतील आणि आपल्या व्यवस्थेतील दोष ते दूर करतील अशी अपेक्षा आहे.संतोष मानेवर कारवाई तर होईलच पण स्वारगेट डेपोचे जे कोणी ईन्चार्ज आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे.आपल्या डेपोतून एक गाडी पळविली जाते, त्यातून नंतर मोठा अनथ र्ओढवतो.याचा पत्त्ताही तेथील यंत्रणेला नसेल तर दोष त्यांनाही द्यावाच लागेल.वरिष्ठांना यातून नामानिराळे होता येणार नाही .एसटीच्या निष्काळजीपणामुळं जवळपास पन्नास-साठ कुडूंबाच्या घरात आज दुःखाचं वातावरण आहे.महामंडळ एक लाख रूपये देऊन लोकांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करीत आहे.नुकसान भरपाई तर त्यांना ध्यावीच लागेल पण ते काही प्रायश्चित्त नाही.महामंडळाचा गुन्हा एवढा भयंकर आहे की,त्यांना क्षमाही करता येणार नाही.पण अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून यंत्रणेतील दोष दूर करून काऱभारात महामंडळानं सुघारणा केल्या तर मला वाटतं ज्याचें पळी गेले आहेत त्यांचं बलिदान सार्थकी तरी लागेल.महामंडळ या संदर्भात काय करणार आहे ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे.सुरक्षा पंधरवाडा,सौजन्य सप्ताहा यासारखे कार्यक्रम महामंडळ घेत असते.पण त्यातून कोणी कर्मचारी सौजन्यमूर्ती बनलाय हे दिसत नाही किंवा अपघात बंद झालेत याचाही अमुभव येत नाही.उपाय असे दिखावू किंवा तकलादू नकोत.कायम स्वरूपी काही सोय करण्याची गरज आहे.कारण एसटी ही लोकांची गरज आहे.लाखो लोक एसटीवरच अवलंबून आहेत.हे सत्य समजून घेत महामंडळानं आपल्या कारभारात अमुलाग्र बदल केले पाहिजेत.केवळ संगणकाच्या पातळीवरचेच हे बदल नको आहेत.मानसिकतेच्या आणि मानुसकीच्या पातळीवरही हे बदल झाले पाहिजेत असंच मला वाटतं.
-एस.एम.देशमुख
|