
अडथळ्याची शर्यत पार करू उजनीचे पाणी अखेर उस्मानाबाद शहरात आले.जंगलेली जुनी पाईप लाईन,नियोजनाचा अभाव,पालिकेचा ढिसाळ कारभार,यामुळे अजूनही शहरातील अर्धा भागाला उजनीचे पाणी मिळाले नाही.उजनी योजनेवर प्रचंड खर्च करूनही शहरातील परिस्थिती जैसे थे आहे.
उस्मानाबाद हे जिल्ह्याचे ठिकाण असून, शहराची लोकसंख्या १ लाख २७ हजार आहे. या शहराला तेरणा आणि रूईभर मध्यम प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो,तसेच पाणी कमी पडल्यास वलगुड,शिंगोली लघु पाटबंधारे प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो.मात्र तीन वर्षातून एकदा दुष्काळ पाचवीला पुजल्यामुळे उस्मानाबादकरांना पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ येत आहे.
गेल्या तीन वर्षापासून सातत्याने सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने तेरणा मध्यम प्रकल्प गेल्या ४० वर्षात प्रथमच पुर्णपेण कोरडेठाक पडले,रूईभर मध्यम प्रकल्प असून नसल्यासारखे आहे.त्यामुळे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या चोराखळी लघु पाटबंधारे तलावातून ५१ टँकरव्दारे पाणी आणून, ते तेरणा फिल्टर टाकीत टाकले जात होते,मात्र त्यात गोलमाल झाल्याचे उघड आहे.कारण शहराची पाण्याची गरज दररोज ४५ लाख लिटर आहे, ५१ टॅकरचा हिशोब केला तर दोन दिवसांला पाणी येणे अपेक्षित होते,मात्र ३० दिवसांतून एकदा नळाला पाणी येत होते.मग पाणी कोठे जिरत होते,या प्रश्न अनुत्तरीय आहे.टॅँकरवर झालेले ६७ कोटी रूपये पाण्यात गेल्याचे स्पष्ट आहे.कारण उस्मानाबाद ते चोराखळी केवळ ३० किलो मीटर अंतर आहे.केवळ पाच कोटीत चोराखळी पाणी पुरवठा योजना पुर्ण झाली असती,मात्र टँकर लॉबी जगविण्यासाठी शासनाचा पैसा विनाकारण खर्च करण्यात आला.
उजनी पाणी पुरवठा योजना
राणा जगजितसिंह पाटील यांना मागच्या मंत्रीमंडळात अचानक राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली.डॉ.पद्मसिंह पाटील यांच्यावर पवन राजेनिंबाळकर यांच्या हत्त्येचा कलंक लागल्याने राणा पाटील अचानक मंत्री झाले होते,त्यावेळी ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते.
राणा पाटील मंत्री होताच,त्यांनी अनेक योजना उस्मानाबादला आणण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यापैकी काही योजना पुर्ण होण्याअगोदरच बारगळल्या होत्या.उजनी पाणी पुरवठा योजना मात्र,पुर्ण झाली असली तरी,याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
चार वर्षापुर्वी ही योजना केंद्राने मंजूर केल्यानंतर,त्याचे काम एमजीपीला न देता,चेन्नईच्या नागार्जुन कंपनीला देण्यात आले.खासगी ठेकेदारामार्फत काम केल्याने,या योजनेबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ज्यावेळी ही योजना मंजूर झाली,त्यावेळी त्याचा खर्च १०३ कोटी होता.ही योजना दोन वर्षात पुर्ण होणे,अपेक्षित असताना,चार वर्षे लागली आणि त्याचा खर्च १८३ कोटी रूपये गेला.विरोधकांनी अडचणी आणल्याने ही योजना लांबल्याचा आरोप आ.राणा पाटील यांनी केला असला तरी,त्यात थोडीफार सत्यता आहे.मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे या योजनेला गती आली.
यंदा जिल्ह्यात अभुतपुर्व दुष्काळ पडल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५१ कोटी रूपये मदत जाहीर केली आणि ही योजना मार्गी लागली,अन्यथा ही योजना बासनात गुंडाळून ठेवावी लागली असती.दुष्काळच या योजनेच्या पथ्यावर पडला,असे म्हणावे लागेल.
काय आहे अडचण...
उस्मानाबाद ते उजनी ११४ किलोमीटर अंतर आहे. या योजनेची पाईप लाईन ठिकठिकाणी सिमेेंटचे पिलर उभे करून न करता अंडरग्राऊंड करण्यात आली आहे.यामुळे या योजनेचा खर्च कमी झाला असला तरी,भविष्यात अडचणी उद्भवू शकतात.दुसरे असे की, कौडगाव ते उस्मानाबाद हे आठ किलोमीटर अंतर ७५० फुट चढाव आहे.उजनीचे पाणी कौडगाव पर्यंत येत होते,परंतु ते तेरणा फिल्टर टाकीत पडत नव्हते.कारण कौडगाव - हातलादेवी परिसरात बुस्टर (पंप हाऊस) करणे गरजेचे होते.शेवटी हातलादेवी समोरील विहिरीत पाणी ओतण्यात आले आणि तेथून ते लिफ्ट करण्यात आले.जर या ठिकाणी बुस्टर करण्यात आले असते तर दीड महिन्यापुर्वीच पाणी शहरात पोहचले असते.
पाणी पंप केले की ते वाटेतच लिक होत होते, एक लिकेज काढले की दुसरे लिकेज होत होते. हे केवळ हातलादेवी परिसरात बुस्टर न केल्यामुळे घडत आहे,याचा जावाईशोध दीड महिन्यानंतर लागला,मग पाणी हातलादेवीसमोरीत विहिरीत सोडून पाणी लिफ्ट करण्यात आले.
या मुळ योजनेत हातलादेवीजवळ बुस्टर प्लॅन होता.पण तो रद्द करण्यात आल्यामुळे त्याचे परिणाम भोगावे लागले.योजना आणणारे म्हणतात की,बुस्टर केंद्राने नामंजूर केला,मग आता नामंजूर असताना,बुस्टर का बांधण्यात येत आहे,याचे उत्तर त्यांच्याकडे नाही.सध्या हातलादेवी परिसरात तात्पुरत्या स्वरूपाचे बुस्टर बांधण्याचे काम सुरू आहे.योजनेत काटकसर करून,गाळा मारण्याचा फंदात पडल्याने,त्याचे भोग उस्मानाबादकरांना भोगावे लागले.
महागडे पाणी
उजनी पाणी पुरवठा ही योजना वरवर चांगली वाटत असली तर या योजनेचा खर्च आणि त्यानंतर येणारा खर्च परवडणारा नाही.या पाणी पुरवठा योजनेचे बिल दरमहा लाखोच्या घरात येणार आहे.उस्मानाबाद नगर पालिकेकडे पथ दिव्याचे बिल भरण्यासाठी पैसे नाहीत,मग उजनी पाणी पुरवठा योजनेचे बिल भरण्यासाठी पैसे कोठून येणार,हा प्रश्न गंभीर आहे.
उस्मानाबाद शहरातील पुर्वीची पाईप लाईन जुनाट आणि गंजलेली आहे.नविन पाईप लाईनचे काम अर्धवट आहे.काही दिवसांनंतर नळाला मीटर बसविण्यात येणार आहेत,मग पाण्याचे बिल पाहून लोकांचे डोळे गरगर फिरणार आहेत.उजनीचे पाणी नको रे बाबा,म्हणण्याची पाळी येवू नये म्हणजे झाले.
हे करणे सोईस्कर
१)उस्मानाबाद ते चोराखळी केवळ ३० किलोमीटर अंतर आहे. येथून टँकरने पाणी न आणता चोराखळी पाणी पुरवठा योजना करा.
२)तेरणा,रूईभर शिंगोली,वलगुड आणि चोराखळी येथील पाण्याचे स्त्रोत आटल्यानंतर मग उजनीचे पाणी पंप करा.
३) उजनीचे पाणी केवळ उद्योगधंद्यासाठी परवडणारे आहे. कौडगाव एमआयडीसी योजना कार्यान्वीत करून, उजनीचे पाणी कौडगाव एमआयडीसीसाठी उपयुक्त ठरू शकते.
३) उस्मानाबाद शहरातील नविन पाईन लाईन कार्यान्वित करून, सर्व अनाधिकृत कनेक्शन तोडा. वाटल्यास मीटर बसवा पण स्वच्छ आणि भरपूर पाणी द्या.
*****
सुनील ढेपे
उस्मानाबाद
मो.९४२०४७७१११