
मुंबई - विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसने लातूर येथून दिलीपराव देशमुख, चंद्रपूरमधून राहुल पुगलिया यांना उमेदवारी दिल्याचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी जाहीर केले. तसेच शिवसेना-भाजप युतीतर्फे चंद्रपूरमधून नितेश भांगडिया आणि अमरावतीमधून प्रवीण पोटे यांचीही नावे भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केली.
केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू दिलीप देशमुख यांना तिसर्यांदा विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याने पक्षामध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. लातूरमध्ये काँग्रेसकडे २१७ मते आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे २५१, तरीही हा मतदारसंघ राष्ट्रवादीने न मागता काँग्रेससाठी सोडला. त्यामुळे विलासराव यांनी पुन्हा एकदा आपले राजकीय कौशल्य वापरून आपल्या भावाला तिसर्यांदा ही संधी मिळवून दिली आहे. पक्षामध्ये एखाद्या उमेदवाराला दोन वेळा संधी दिली जाते. मात्र, दिलीप देशमुख हे आजारी असल्याने गेले काही महिने सक्रीय राजकारणामध्ये सहभागी नाहीत. अशावेळी त्यांना तिसर्यांदा दिलेल्या विधान परिषदेच्या उमेदवारीमुळे पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे. विलासराव स्वत: केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचा मुलगा अमित आमदार आहे. चंद्रपूरमध्ये राहुल पुगलिया यांना जागा दिली असून ते पक्षाचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचे पुत्र आहेत. युतीतर्फे चंद्रपूरमध्ये उमेदवारी मिळालेले नितेश भांगडिया हे व्यावसायिक असून त्यांचे वडील भाजपचे सक्रीय कार्यकर्ते होते. अमरावतीमधून पोटे यांना उमेदवारी देण्यात आली असून ते बिल्डर आहेत. त्यांनी अलीकडेच पक्षात प्रवेश केला होता.
|